जपानमध्ये माउंट ऑनटेक ज्वालामुखीचा उद्रेक झाला असून त्यात ३० जण मरण पावल्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. बेशुद्ध असलेल्या ३० व्यक्ती सापडल्या असून त्या बहुदा मरण पावलेल्या आहेत. त्यांचे देह ज्वालामुखीच्या शिखरावर सापडले. त्यांच्यात श्वास चालू नसून हृदये बंद पडली आहेत. अजून डॉक्टरांनी त्यांची तपासणी केलेली नाही. नागानो परफेक्चर पोलिसांनी सांगितले, की आज या ३० व्यक्तींचे देह सापडले असून त्यांची ओळख पटलेली नाही. माउंट ऑनटेक हा ज्वालामुखी मध्य जपानमध्ये असून त्याचा उद्रेक झाला. काल दुपारच्या सुमारास हा उद्रेक झाला व पांढऱ्या रंगाचा धूर त्यातून बाहेर येऊ लागला. आकाशात मोठय़ा प्रमाणावर राख उडाली असून सर्व भाग राखेने व्यापला आहे. ज्वालामुखी डोंगराच्या वरच्या भागात २५० लोक अडकले होते त्यातील अनेक जणांना रात्री खाली आणण्यात आले.
हाँगकाँमध्ये निदर्शने
हाँगकाँग: हाँगकाँगमध्ये लोकशाही समर्थकांनी पोलिसांशी कडवा संघर्ष सुरू केला असून सरकारी मुख्यालयाबाहेर ठिय्या आंदोलन सुरू करण्याचा इशारा आंदोलकांनी दिला आहे. ब्रिटिशांची पूर्वीची वसाहत असलेल्या हाँगकाँगला चीनने खऱ्या लोकशाही सुधारणांचा लाभ मिळवून द्यावा अशी निदर्शकांची मागणी आहे. विद्यार्थी व कार्यकर्ते सरकारी संकुलाच्या बाहेर जमा झालेले असून संपूर्ण आठवडा ही निदर्शने चालली आहे. ऑक्युपाय सेंट्रल सिव्हील मुव्हमेंटच्या नेत्यांनी सांगितले की, आम्ही दीर्घकाळचे ठिय्या आंदोलन सुरू करीत आहोत. निदर्शकांनी डोक्यावर हेल्मेट घातली असून पोलिसांनी मिरची पूड वापरल्यास त्रास होऊ नये म्हणून फडकी बांधली आहेत.
पोलिसांवर गोळीबार
वॉशिंग्टन: नि:शस्त्र कृष्णवर्णीय मुलाची गोळ्या घालून हत्या केल्याच्या कारणावरून काही महिन्यांपूर्वी वांशिक हिंसाचार आणि राष्ट्रीय क्षोभ उसळल्यानंतर येथील फर्गसन शहरात दोन पोलीस अधिकाऱ्यांवर अज्ञातांनी गोळीबार केल्याची घटना शनिवारी घडली. दरम्यान, अन्य एका घटनेत येथील महामार्गानजीक वाहनातून प्रवास करणाऱ्या एका पोलीस अधिकाऱ्यावर गोळीबार करण्यात आला. मात्र यात त्यांना कोणतीही इजा झाली नसल्याचे प्रवक्त्याने सांगितले.  
सकाळी ९ वाजून १० मिनिटांनी शहरात गस्त घालीत असताना एका पोलीस अधिकाऱ्याच्या डाव्या हाताला गोळी लागल्याचे संत लुईस कौन्टी पोलीस विभागाचे प्रवक्ते ब्रायन शेलमन यांनी सांगितले. फर्गसन समाज केंद्रानजीक दुकानांची तपासणी करत असताना या अधिकाऱ्यावर गोळीबार करण्यात आला. एक पुरुष पोलीस अधिकाऱ्यासमोर आला आणि त्यांना डिवचले व तेथून पळ काढला. यानंतर पोलीस अधिकाऱ्याने त्याचा पायी पाठलाग सुरू केला. याच वेळी संशयिताने गोळीबार केला.
अंबानी सर्वात श्रीमंत
न्यूयॉर्क: भारतात स्पोर्ट्स क्लबचे मालक असलेल्या व्यक्तींचा समावेश जगातील अब्जाधीशांमध्ये होत असल्याचा नवीन कल दिसत असून रिलायन्स इंडस्ट्रीजचे मालक व मुंबई इंडियन्स टीमचे मालक मुकेश अंबानी हे भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत, असे फोर्बस मासिकाने म्हटले आहे. फोर्बसच्या मते श्रीमंतीची ही स्पर्धा क्रिकेट, कबड्डी, हॉकी व बॅडमिंटनचे संघ पदरी बाळगणाऱ्या व्यक्तींमध्येच दिसून येते. मुकेश अंबानी व त्यांच्या पत्नी नीता अंबानी यांची आयपीएल मुंबई इंडियन्स संघावर मालकी असून त्यांची संपत्ती २० कोटी डॉलर इतकी आहे.
रिलायन्स इंडस्ट्रीजने मुंबई इंडियन्सची मालकी २००८ मध्ये ११ कोटी डॉलरला घेतली होती. दुसरे अब्जाधीश जी.एम राव हे फोर्बसच्या यादीत ९८ व्या स्थानावर असून दिल्ली डेअर डेव्हील्स या संघावर त्यांची मालकी आहे. माध्यम सम्राट कलानिधी मारन यांची सनरायजर्स हैदराबाद कंपनीवर मालकी असून त्यांचा क्रमांक अब्जाधीशांमध्ये ३३ वा लागला आहे. भारतात ज्या व्यक्तीकडे स्पोर्ट्स क्लब मालकीचे आहेत त्यांची प्रतिष्ठा उंचावली आहे.