नवी दिल्ली : मुंबई-दिल्लीमधील राष्ट्रीय महामार्गाचा जवळपास ३० टक्के भाग गाडी, बस आणि ट्रकसाठी धोकादायक आहे. इतकेच नव्हे तर दुचाकी आणि पायी चालणाऱ्यांसाठीही हा महामार्ग जीवघेणा बनला आहे. जागतिक बँक, भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यासह अनेक संस्थांनी केलेल्या अभ्यासातून ही बाब समोर आली आहे. मुंबई-चेन्नई सुवर्ण चतुष्कोणचा निम्म्याहून अधिक भाग धोकादायक असल्याचेही म्हटले आहे.

जागतिक बँकेच्या ग्लोबल सेफ्टी, इंटरनॅशनल रोड अ‍ॅसेसमेण्ट प्रोग्राम आणि प्राधिकरणाने दोन मार्गिकांच्या सुरक्षा मानदंडाची पाहणी करून त्याला श्रेणी दिली. त्यामध्ये मुंबई-दिल्ली आणि मुंबई-चेन्नई या दोन मार्गिकांचा अभ्यास करण्यात आला. दोन्ही मार्गिकांच्या केवळ ४० कि.मी.च्या अंतराला पंचतारांकित श्रेणी देण्यात आली आहे, तर ३९ टक्के भागाला एक किंवा दोन स्टार श्रेणी देण्यात आली आहे. एक किंवा दोन स्टार श्रेणी दिलेला भाग हा महामार्गावरून प्रवास करणाऱ्या सर्वासाठी धोकादायक आहे.

दिल्ली-मुंबई या सुवर्ण चतुष्कोणमधील ८२४ कि.मी.च्या भागाला एक किंवा दोन स्टार श्रेणी देण्यात आली आहे. त्यामुळे या धोकादायक भागात प्रवास करताना गाडीचा वेग प्रति किलोमीटर ८० इतकाच ठेवण्याची सूचना करण्यात आली आहे. देशातील रस्त्यांच्या जाळ्यांपैकी एकूण दोन टक्के रस्ते फक्त राष्ट्रीय महामार्गामध्ये येतात, परंतु राष्ट्रीय महामार्गावरील अपघातांची संख्या पाहता हा अहवाल महत्त्वाचा आहे. रस्ते अपघातांमध्ये होणाऱ्या मृत्यूंपैकी ३६ टक्के मृत्यू हे राष्ट्रीय महामार्गावर होतात.