लहान मुलांची तस्करी करणाऱ्या टोळीला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. त्यांनी आतापर्यंत भारतातील ३०० मुलांच तस्करी करत त्यांना अमेरिकेत विकले होते. या एका मुलांची किंमत त्याने थोडीथोडकी नाही तर तब्बल ४५ लाख इतकी घेतली होती. गुजरातमध्ये राहणाऱ्या राजूभाई गमलेवाला उर्फ राजूभाई हे यामागील मुख्य सूत्रधार असल्याचे समोर आले आहे. राजूभाई यांनी २००७मध्ये या रॅकेटची सुरुवात केली होती, ११ वर्षात ३०० मुलांना अशापद्धतीने विकले. आता या ३०० मुलांचे अमेरिकेत नेमके काय झाले याबाबत मात्र अद्याप स्पष्टता नाही.

या रॅकेटमध्ये सहभागी असणाऱ्या काही सदस्यांना मार्च महिन्यात ताब्यात घेण्यात आले होते. मात्र त्यानंतरही हे काम सुरु असल्याचे समोर आले आहे. ‘टाइम्स ऑफ इंडिया’ने दिलेल्या वृत्तानुसार, विक्री करण्यात आलेल्या या मुलांचे वय ११ ते १६ वर्षांच्या दरम्यान असल्याचेही समोर आले असून यातील अनेक मुले गुजरातमध्ये राहणारी असल्याचेही समजले आहे. एका पोलीस कर्मचाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, मुलांचा सांभाळ करण्यास असमर्थ असणाऱ्या पालकांनी या मुलांची विक्री केली होती. अमेरिकेतील ग्राहकांकडून मुलांची मागणी झाल्यावर राजूभाई आपल्या माणसाला एखादे गरिब कुटुंब शोधण्यास सांगत असत. मग या कुटुंबाकडून मुलाची विक्री केली जात असे.

इतकेच नाही तर या मुलांना अमेरिकेत पाठवायचे असल्याने त्यांच्याकडे पासपोर्ट असणे आवश्यक होते. मग आपल्या मुलांचे पासपोर्ट भाड्याने देतील अशा कुटुंबियांचाही शोध घेतला जात असे. हे पासपोर्ट घेऊन त्यावरील चेहरा आणि मुलांचा चेहरा सारखा होईल अशादृष्टीने प्रयत्न केले जात असत. मग मुलाला अमेरिकेला पाठविण्यासाठीही कोणाचीतरी मदत घेतली जात असे. त्यासाठी त्या व्यक्तीलाही पैसे देण्यात येत असत. या मुलाला अमेरिकेत पोहचविणारा व्यक्ती जेव्हा परत येईल तेव्हा तो पासपोर्ट आणत असे. मग हा पासपोर्ट प्रत्यक्ष ज्यांचा आहे त्यांना परत दिला जात असे. अभिनेत्री प्रिती सूद हिने दिलेल्या माहितीमुळे या रॅकेटचा पर्दाफाश झाला असून आता पोलिसांनी ४ जणांना अटक केली आहे. यातील एक जण पोलीस उपनिरीक्षकांचा मुलगा असल्याचे समोर आले आहे. यानंतर राजूभाई गमलेवाला यालाही अटक करण्यात आली असून पुढील चौकशी सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.