पुलवामा हल्ल्यानंतर घरमालकांनी विद्यार्थ्यांना हाकलल्याच्या तक्रारी

चंडिगड : पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर काश्मीर खोऱ्यातून शिकण्यासाठी उत्तराखंडमधील डेहराडून व हरयाणातील अंबालात आलेल्या विद्यार्थ्यांची छळवणूक सुरू झाल्याने तेथील तीनशे काश्मिरी विद्यार्थी मोहालीत आले आहेत. ते काश्मीर खोऱ्यात परत जाणार आहेत. विद्यार्थी संघटनेने त्यांची पंजाबमधील मोहाली येथे राहण्याची सोय केली आहे. काही काश्मिरी युवक उत्तराखंडची राजधानी डेहराडून येथे शिकत होते, त्यांनी असा आरोप केला की घरमालकांनी त्यांना काढून टाकले असून छळवणुकीला तोंड द्यावे लागत आहे. काश्मिरी विद्यार्थ्यांना घरे भाडय़ाने दिल्यामुळे मालमत्तेवर हल्ले होतील या भीतीतून घरमालकांनी  विद्यार्थ्यांना घरातून काढून दिले आहे. गेल्या दोन दिवसांत डेहराडून येथून २८० तर अंबाला येथून ३० विद्यार्थी येथे आले आहेत, असे जम्मू काश्मीर विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष ख्वाजा इतरत यांनी म्हटले आहे. एकूण दीडशे विद्यार्थी जम्मूकडे निघाले आहेत. तेथून ते काश्मीर खोऱ्यात जातील. आम्हाला मोहाली येथे थांबा घ्यायचा आहे असे विद्यार्थ्यांनी म्हटले होते, कारण ते सुरक्षित ठिकाण आहे.  परीक्षा जवळ आल्या असताना काढून देण्यात आल्याने या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार आहे. शनिवारी अज्ञात लोकांनी अंबाला जिल्हय़ात मुलाना येथे आपल्यावर हल्ला केला असे एका विद्यार्थ्यांने सांगितले.

काश्मिरी विद्यार्थ्यांना संरक्षण दिले जाईल, असे आश्वासन पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांनी दिले आहे. दरम्यान, अंबाला पोलिसांनी मुलाना येथे काश्मिरी विद्यार्थ्यांना लोक  घर खाली करण्यास सांगत असल्याच्या चित्रफितीवरून गुन्हा दाखल केला आहे. अंबालाच्या पोलीस अधीक्षक आस्था मोदी यांनी सांगितले, की दोन मुलांना घर खाली करण्यासाठी धमकावत असतानाची आणखी एक चित्रफीत हाती आली आहे. एकूण ६०० काश्मिरी विद्यार्थी अंबाला जिल्हय़ात असून, त्यातील ३५० ते ४०० जण मुलाना येथील खासगी विद्यापीठात शिकत आहेत.

दरम्यान, हरयाणातील पंचकुलासह अनेक जिल्हय़ांत अनेक काश्मिरी विद्यार्थी असून तेथे सुरक्षा वाढवण्यात आली आहे.