आंध्र प्रदेशातील पश्चिम गोदावरी जिल्ह्य़ात इलुरु येथे अज्ञात आजारामुळे ३०० जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यात मुलांचा मोठय़ा प्रमाणात समावेश आहे. प्रदूषित पाण्यामुळे हा आजार निर्माण झाल्याचा अंदाज अधिकाऱ्यांनी व्यक्त केला असून विषाणूजन्य मेंदूज्वराची शक्यताही नाकारलेली नाही.

इलुरू रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. मोहन यांनी सांगितले, की अनेक लोक आजारी पडले असून रुग्णांची संख्या वाढत आहे. काल रात्रीपासून १४० जणांना रुग्णालयात दाखल केले असून नंतर घरी पाठवण्यात आले. यात मळमळ, चक्कर येणे अशी लक्षणे दिसत आहेत, पण स्पष्ट कारण समजलेले नाही.  जिल्हाधिकारी आर. मुथायला राजू यांनी सांगितले, की रक्ताचे नमुने घेण्यात आले असून ते तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. आरोग्य मंत्री ए. काली कृष्णा यांनी सांगितले, की डॉक्टरांची पथके विजयवाडा येथून स्थानिक डॉक्टरांच्या मदतीसाठी रवाना झाली आहेत. ते रोगाची माहिती घेतील. लोक आजारी पडत असून त्यात मुलांची संख्या जास्त आहे. वांत्या, डोळ्यांची आग होणे, चक्कर येणे अशी लक्षणे त्यात दिसत आहेत. काहींची प्रकृती चिंताजनक झाली, त्यामुळे त्यांना शनिवारी रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण आता सर्व जण सुरक्षित आहेत. अधिक दक्षतेसाठी आणखी १०० खाटा रुग्णालयात उपलब्ध केल्या आहेत. जिल्हाधिकारी राजू यांनी दिलेल्या माहितीनुसार अधिकाऱ्यांनी या भागात घरोघरी जाऊन पाण्याची तपासणी सुरू केली आहे.

विरोधी तेलगू देसम पक्षाने सरकारवर टीका केली असून पेयजलस्रोत सुरक्षित नसल्याचे म्हटले आहे. गेल्या आठ महिन्यात पिण्याच्या पाण्याचे स्रोत स्वच्छ करण्यात आलेले नाहीत. त्यामुळे दीडशे जण आजारी पडले आहेत. आरोग्य मंत्र्यांच्या  मतदारसंघात हा प्रकार झाला असून वायएसआर रेड्डी सरकारचा  निष्काळजीपणा याला कारणीभूत आहे, असे तेलगू देसमचे प्रमुख एन. चंद्राबाबू नायडू यांनी म्हटले आहे.