News Flash

मैसूरच्या शेतकऱ्याची कमाल ! एक एकराच्या जागेत घेतो ३०० प्रकारची पिकं

वर्षाकाठी कमावतोय १० लाखांचा नफा

शेती हा एकाप्रकारे जुगार मानला जातो. भारतात बहुतांश भागात शेती ही मान्सूनच्या भरवशावर केली जाते. त्यात गेल्या काही वर्षांत हवामानात झालेले बदल, दुष्काळ, पाण्याची टंचाई यामुळे शेतकऱ्यांचं अक्षरशः कंबरडं मोडलं आहे. कर्नाटकच्या मैसूर येथील हुंसूर तालुक्यातील थमैया पी.पी. हा शेतकरीही १९८४ सालापासून याच दुष्टचक्रात अडकला. काळानुरुप शेतीत बदल करायचे म्हणून थमैया यांनी सेंद्रीय खतांचा वापरही वाढवला. परंतू अपुऱ्या पाठीपुरवठ्यामुळे प्रत्येकवेळी त्यांच्या पदरात नुकसानच पडायचं. या दुष्टचक्राला कंटाळलेल्या थमैया यांनी काही वर्षांपूर्वी प्रयोग म्हणून एका एकराच्या जमिनीवर आंतरपीक पद्धतीने जवळपास ३०० प्रकारची पिकं घ्यायला सुरुवात केली. आश्चर्याची गोष्ट म्हणजे प्रयोग म्हणून सुरु केलेल्या या शेतीचा थमैया यांना चांगला फायदा झाला.

६९ वर्षीय थमैया यांना सध्या चांगला आर्थिक फायदा मिळत असून त्यांचा शेतीतला पाण्याचा वापरही सुमारे ५० टक्क्यांनी कमी झाला आहे. यामुळे वर्षाकाठी थमैया १० लाखांचा नफा कमवत आहेत. Multy Layer Farming च्या माध्यमातून थमैया आपल्या एका एकराच्या शेतात नारळ, फणस, विविध कडधान्य, भाजीपाला, आंबा, सुपारी, केळी अशी विविध पिकं घेत आहेत.

थमैया करत असलेलं Five Layer Farming असतं तरी काय??

या पद्धतीत शेतकरी जागेचा जास्तीत जास्त वापर व्हावा यासाठी दोन वेगळ्या उंचीची झाडं एकाच ठिकाणी आजुबाजूला लावतो. थमैया द बेटर इंडिया संकेतस्थळाशी बोलत असताना या पद्धतीचा फायदा समजावून सांगत होते. “ज्यावेळी मी एक झाड लावत असतो त्यावेळी दुसरं झाडं हे आधीच मोठं होऊन त्यावर फळं तयार झालेली असतात. यामुळे झाडांना लागणारं पाणी हे खूप कमी लागतं. बऱ्याचवेळा एका झाडाला घातलेलं पाणी हे आजुबाजूला असलेल्या दोन ते तीन झाडांना पुरून जातं. ज्याने बऱ्याच प्रमाणात पाणी वाचतं.”

सुरुवातीला थमैया यांना जेव्हा या पद्धतीची माहिती कळाली, तेव्हा ही पद्धत किती यशस्वी ठरेल याबद्दल ते स्वतः साशंक होते. परंतू मेहनत घेतल्यानंतर ज्यावेळी चांगले निकाल दिसायला लागले त्यावेळी थमैया यांना विश्वास बसला. यासाठी त्यांनी काही शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन Five Layer Farming कशा पद्धतीने केलं जातं याची माहिती घेतली.

जाणून घ्या थमैया यांनी केलेल्या प्रयोगाबद्दल –

१) थमैया यांनी आपल्या शेतात पूर्व आणि पश्चिमेच्या टोकावर नारळाची झाडं लावली. या झाडांमध्ये ३० फुटांचं अंतर राहील याची काळजी त्यांनी घेतली.

२) दोन नारळांच्या झाडांच्या मध्ये थमैया यांनी चिकूची झाडं लावली. यानंतर नारळ आणि चिकूच्या झाडामध्ये जी जागा उरेल तिकडे थमैया यांनी केळीची झाडं लावली.

३) नारळाच्या झाडाखाली थमैया यांनी सुपारी, मसाले व इतर छोटी पिकं घेण्यास सुरुवात केली.

४) यानंतर शेताच्या दक्षिण आणि उत्तर टोकावर थमैया यांनी आंबा, जांभूळ, फणस, खरबूज अशी झाडं लावली.

५) आंबा आणि फणस या झाडांच्या मध्ये थमैया यांनी तूर, मूग, लिंबू, शेवग्याची शेंग अशी छोटी-छोटी पिकं घ्यायला सुरुवात केली.

६) याव्यतिरीक्त थमैया यांनी मधल्या भागात उरलेल्या जागेत भाजीपाला, कडधान्यांचं पिक घ्यायला सुरुवात केली.

७) याव्यतिरीक्त हळद, आलं, गाजर, बटाटे अशी पिकंही थमैया घ्यायला लागले.

याव्यतिरीक्त थमैया यांनी आपल्या शेतात अनेक आयुर्वेदीक औषधीही लावल्या आहेत. याचसोबत एकदा पिक घेऊन झाल्यानंतर झाड तोडण्याऐवजी थमैया ते मुळापासून उपटून टाकायला लागले. ज्यामुळे सूर्यप्रकाश जमिनीपर्यंत पोहचून पाणी व इतर पोषणमुल्यांमुळे जमिनीचा पोतही चांगला रहायला लागला. या सर्व पिकांमुळे थमैया यांना वर्षाकाठी चांगला फायदा मिळायला लागला. नारळ, सुपारी यासारख्या पिकांमुळे थमैया यांनी वर्षाकाठी चांगला फायदा मिळतोय. याचसोबत इतर पिकांमधून मिळणाऱ्या फायद्यामुळे थमैया वर्षाकाठी १० लाखांचा फायदा कमावत आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 30, 2020 2:43 pm

Web Title: 300 plant varieties in 1 acre increases mysuru farmers profits to 10 lakhs psd 91
Next Stories
1 नितीश कुमार यांचं सरकार संकटात?; ‘जदयू’चे १७ आमदार ‘राजद’च्या वाटेवर
2 1500 टॉवर्सची तोडफोड, Jio ने पंजाबच्या मुख्यमंत्र्यांना लिहिलं पत्र; हस्तक्षेप करण्याची मागणी
3 मोठी बातमी! ब्रिटनकडून ऑक्सफर्डच्या करोना लसीला मान्यता
Just Now!
X