उत्तर प्रदेशातील हाथरस सामूहिक बलात्कार घटनेवर देशभरात संतापाचं वातावरण असताना पोलिसांकडून विरोधी पक्षातील नेते आणि माध्यमांची होणारी अडवणूक यामुळे उद्रेक वाढताना दिसत आहे. हाथरसला उत्तर प्रदेश सरकारने छावणीचं स्वरुप दिलं असून तब्बल ३०० पोलिसांची फौज तैनात करण्यात आली आहे. पोलिसांनी पीडित तरुणीच्या गावात सात पोलीस वाहनं आणि पाच बॅरिकेट्सही उभे केले आहेत.

हाथरसमध्ये १९ वर्षीय दलित तरुणीवर सामूहिक बलात्कार करण्यात आला होता. रुग्णालयात उपचार सुरु असतानाच २९ सप्टेंबरला तरुणीचा मृत्यू झाला. यानंतर पोलिसांनी बळजबरीने तरुणीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले असा कुटुंबाचा आरोप आहे. दरम्यान योगी आदित्यनाथ सरकारने गावाला छावणीचं स्वरुप दिलं असून बाहेरील कोणत्याही व्यक्तीला आतमध्ये जाण्याची परवानगी देण्यात आलेली नाही.

आणखी वाचा- हाथरस प्रकरण :पोलीस अधीक्षकांसह तीन अधिकारी निलंबित; योगी सरकारची मोठी कारवाई

पीडित महिलेच्या कुटुंबाने इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना दिलेल्या माहितीनुसार, दोन दिवसांपासून त्यांना घरात कैद करुन ठेवण्यात आलं आहे. पोलीस कदाचित फोनवरही पाळत ठेवत असल्याची कुटुंबाला शंका आहे. पीडितेच्या भावाने फोनवर बोलताना, “जिल्हा दंडाधिकारी मीडियाच येथे नाही तर मग तुमचे व्हिडीओ व्हायरल कसे होत आहेत?,” अशी विचारणा केल्याचं सांगितलं. पुढे बोलताना त्याने हे लोक कदाचित आमच्या फोनवर पाळत ठेवत असून सर्व बोलणं ऐकत असावेत अशी शंका उपस्थित केली आहे.

आणखी वाचा- “मला कोणीच अडवू शकत नाही”, राहुल गांधींचा पीडितेच्या कुटंबाला भेटण्याचा निर्धार

पोलिसांना सर्वात पहिलं बॅरिकेड हाथरस जिल्ह्यातील गावापासून जवळपास अडीच किमी अंतरावर लावलं आहे. येथून गावाकडे जाणारे तिन्ही रस्ते बंद करण्यात आले आहेत. येथेच तृणमूल काँग्रेसचे राज्यसभा खासदार डेरेक ओब्रायन, माजी खासदार ममता ठाकूर यांच्यासोबत धक्काबुक्की झाली होती.

आणखी वाचा- हाथरस प्रकरणामुळे योगी सरकारसह भाजपाची प्रतिमा मलीन झाली- उमा भारती

एका वरिष्ठ अधिकाऱ्याने इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना सांगितलं की, “गावात कोणीही प्रवेश करणार नाही याची खातरजमा करण्यासाठी आम्हाला सांगण्यात आलं आहे. मीडिया, राजकीय नेते तसंच स्थानिक लोकांनाही प्रवेश निषिद्ध आहे. आतमध्ये एक रुग्णालय असल्याने समस्या जाणवत आहेत. याशिवाय दूधाची वाहतूक करणाऱ्या वाहनाला परवानगी देण्यात आली आहे”.