राजधानीतील पोलीस दलाची संख्या वाढविण्याबरोबरच विशेषत: महिलांविरोधातील गुन्हेगारी रोखण्यासाठी पुढील वर्षीपर्यंत दिल्ली पोलीस दलात तीन हजार महिला पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश केला जाणार आहे. महिलांवरील अत्याचार आणि गुन्ह्य़ांशी संबंधित प्रकरणे हाताळण्यासाठी राजधानीतील १६६ पोलीस ठाण्यांमधील अधिकारी व कॉन्स्टेबल या पदांवर महिलांची नियुक्ती केली जाणार आहे.
भरती प्रक्रिया सुरू असून त्यानंतर या महिलांना प्रशिक्षण देण्यात येईल. हे प्रशिक्षण पूर्ण करून दिल्ली पोलीस दलात पुढील वर्षांच्या अखेपर्यंत या महिला कर्मचारी प्रत्यक्ष सेवा बजावतील, असे केंद्रीय गृह मंत्रालयाच्या अधिकाऱ्याने सांगितले. दिल्ली पोलीस दलाचे प्रशासकीय नियंत्रण गृह मंत्रालयाकडे आहे. १६ डिसेंबर २०१२ रोजी राजधानीत घडलेल्या सामूहिक बलात्कार घटनेनंतरच्या काळात महिला पोलीस कर्मचारी पदांना मंजुरी देण्यात आली होती. प्रस्तावानुसार राजधानीतील प्रत्येक पोलीस ठाण्याच्या कर्मचारीवृंदामध्ये दोन महिला पोलीस निरीक्षक व सात महिला कॉन्स्टेबल असावेत, असे ठरविण्यात आले. पोलीस दलातील महिला कर्मचारी भरतीसाठी दिल्ली पोलिसांकडून विशेष प्रक्रिया सुरू करण्यात आली. सध्याची दिल्ली पोलिसांची एकूण संख्या ८० हजार कर्मचारी इतकी असून त्यामध्ये सात हजार महिला पोलीस कर्मचारी आहेत.
लांच्छनास्पद सामूहिक बलात्कार घटनेनंतर न्या. जे. एस. वर्मा समिती आणि न्या. उषा मेहरा आयोग नेमण्यात आला. या समिती व आयोगाने दिलेल्या अहवालात कायदेशीर व पोलीस दलात सुधारणा करण्याचे उपाय सुचविण्यात आले होते. त्याचबरोबर महिला पोलीस कर्मचाऱ्यांची संख्या वाढविण्याचेही सुचविण्यात आले होते.