युरोप आणि अमेरिकेत दैनिक नवीन बाधितांच्या संख्येत मोठय़ा प्रमाणावर सातत्याने वाढ होत असताना भारतात मात्र नवीन बाधितांची दैनिक संख्या सोमवारी ३० हजार ५४८ नोंदवली गेली. हा करोना उद्रेकानंतर नवीन रुग्णांचा दैनिक निचांक आहे, तर दिवसभरात ४३५ बाधितांचा मृत्यू झाल्याने आजपर्यंतची मृत्यूसंख्या १ लाख ३० हजार ७० वर पोहचली आहे.

देशात सर्वाधिक ७ हजार ६०६ नवीन रुग्ण आणि ९५ मृत्यू दिल्लीत झाले आहेत. तर दैनिक करोनाबाधितांहून करोनामुक्तांची संख्या अधिक असल्याने देशातील उपचाराधीन रुग्णांची संख्या १३ हजार ३०३ ने कमी होऊन ४ लाख ६५ हजार ४७८ वर आली आहे. आजपर्यंत देशात आढळलेल्या एकूण ८८ लाख ४५ हजार १२७ बाधितांच्या तुलनेत उपचाराधीन रुग्णांची संख्या ५.२६ टक्के आहे, तर यशस्वी उपचाराने आजपर्यंत देशात ८२ लाख ४९ हजार ५७९ व्यक्ती (९३.२७ टक्के) करोनामुक्त झाले आहेत. देशात नव्याने आढळलेल्या बाधितांपैकी ७६.६३ टक्के बाधित हे दहा राज्य व केंद्रशासित प्रदेशातील आहेत, तर दैनिक बरे झालेल्यांच्या संख्येपैकी ७८.५९ टक्के व्यक्ती हे दहा राज्य व केंद्रशासित प्रदेशांमधील आहेत. दिल्लीत सर्वाधिक ७ हजार ६०६ व्यक्ती करोनामुक्त झाले. केरळात ६ हजार ६८४ व्यक्ती करोनामुक्त झाले, तर नव्याने मृत्यू झालेल्या ४३५ रुग्णांपैकी ७८.८५ टक्के रुग्ण हे दहा राज्य व केंद्रशासित प्रदेशातील आहेत.

७८.८५ टक्के मृत्यू दहा राज्यातील

देशात दिवसभरात झालेल्या ४३५ मृत्यूपैकी ७८.८५ टक्के मृत्यू हे दहा राज्य व केंद्रशासित प्रदेशातील आहेत. सर्वाधिक २१.५ टक्के मृत्यू नवी दिल्लीत झाले असून येथील संख्या महाराष्ट्राहूनही अधिक आहे. सध्या देशातील करोनाचा मृत्यूदर हा १.४७ टक्के असा कमी आहे.

राज्यातील एकूण मृत्यूसंख्याही ४६ हजारांवर

राज्यात दिवसभरात २,५३५ नवीन रुग्ण आढळल्याने आजपर्यंतच्या बाधितांची संख्या १७,४९,७७७ वर पोहचली आहे, तर २४ तासांत ३,००१ व्यक्ती करोनामुक्त झाल्याने आजपर्यंतच्या करोनामुक्तांची संख्या १६,१८,३८० वर (९२.४९ टक्के) पोहचली आहे. राज्यात दिवसभरात ६० मृत्यू झाले. त्यामुळे आजपर्यंतच्या मृत्यूची संख्याही ४६,०३४ वर (२.६३ टक्के) पोहचली आहे.