देशातील अॅसिड हल्ल्याबाबतचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. २०१४ या वर्षात देशभारत ३०९ अॅसिड हल्ल्याच्या प्रकरणांची नोंद झाली असून हे प्रमाण गेल्या तीन वर्षांपेक्षा तब्बल ३०० टक्क्यांनी वाढले आहे.
२०११, १२ आणि १३ या वर्षांत देशात अनुक्रमे ८३, ८५ आणि ६६ इतक्या अॅसिड हल्ल्याच्या प्रकरणांची नोंद होती. तर २०१४ या वर्षात अॅसिड हल्ल्याची एकूण ३०९ प्रकरणे आढळून आली. म्हणजे गेल्या तीन वर्षांच्या सरासरीपेक्षा ही वाढ जवळपास चौपट आहे.
देशातील महिलांच्या सुरक्षेबाबत धोक्याची घंटा वाजवणारी ही आकडेवारी गृहमंत्रालयाने आयोजित केलेल्या बैठकीत समोर आली. या बैठकीत राष्ट्रीय गुन्हे नोंदणी केंद्राच्या मदतीने केंद्र आणि राज्य पातळीवरील अधिकाऱयांनी या संबंधीची सविस्तर आकडेवारी सादर केली. यात नोव्हेंबर २०१४ पर्यंतच्या आकडेवारीनुसार उत्तरप्रदेशमध्ये सर्वाधिक १८५ अॅसिड हल्ल्यांची नोंद झाली. तर, मध्यप्रदेशात ५३ अॅसिड हल्ल्याची प्रकरणे आढळून आली. तसेच राजधानी दिल्लीत २७ अॅसिड हल्ल्याच्या गुन्ह्यांची नोंद आहे.
धक्कादायबाब अशी की, २०११, १२ आणि १३ या तीन वर्षांमधील एकूण २३४ अॅसिड हल्ल्यांच्या घटनांमध्ये एकूण ३३६ जणांना अटक करण्यात पोलिसांना यश आले. मात्र, २०१४ या एका वर्षातील ३०९ घटनांमध्ये अद्याप २०८ जणांनाच अटक करण्यात आली आहे. उत्तरप्रदेशात तर जवळपास ६६ प्रकरणांत अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.