मध्य प्रदेशमधील इंदूर जिल्ह्याला करोनाचा सर्वाधिक फटका बसला आहे. असं असतानाच इंदूर शहरातील एका ज्वेलर्सच्या दुकानामधील तब्बल ३१ कर्मचाऱ्यांना करोनाची लागण झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. सणासुदीच्या कालावधीमध्ये या ज्वेलर्सच्या दुकानामधून खरेदी करणाऱ्या ग्राहकांचा शोध घेण्याचं काम करोना कॉन्टॅक्ट ट्रेसिंग करणाऱ्या प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी सुरु केलं आहे.

नक्की वाचा >> धक्कादायक! संपूर्ण गावच निघालं ‘करोना पॉझिटीव्ह’

“करोनाचा संसर्ग झालेल्या दुकानातील कर्मचारी आणि ग्राहकांच्या संपर्कात आलेल्यांचा शोध घेण्यास आम्ही सुरुवात केली आहे. मागील आठवड्याभरात या लोकांच्या संपर्कात आलेल्यांचा शोध आम्ही घेत आहेत. या लोकांना सर्दी, खोकला, ताप यासारखी काही लक्षण दिसत असतील तर त्यांची करोना चाचणी केली जाणार आहे,” अशी माहिती मुख्य वैद्यकीय अधिकारी असणाऱ्या डॉ. प्रविण जाडिया यांनी एनडीटीव्हीशी बोलताना दिली. आनंद ज्वेल्स या दुकानातील ३१ कर्मचारी करोना पॉझिटिव्ह आढळल्यानंतर दुकान बंद करण्यात आलं असून ते वेळोवेळी सॅनिटाइज करण्यात येत आहेत. ही प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत दुकान पुन्हा सुरु करण्यास परवानगी देण्यात येणार नसल्याचे प्रशासनाने स्पष्ट केलं आहे.

काही दिवसांपूर्वीच देशभरामध्ये दिवाळी आणि धनत्रयोदशीच्या निमित्ताने अनेकांनी घराबाहेर पडत मोठ्या प्रमाणावर वेगवेगळ्या गोष्टींची खरेदीसाठी बाजारांमध्ये गर्दी केल्याचे पहायला मिळालं. मागील काही महिन्यांच्या तुलनेत या महिन्यामध्ये अनेकजण घराबाहेर पडल्याचे चित्र दिसून आलं. दिल्ली, मुंबईसारख्या काही शहरांमध्ये तर गर्दीच्या ठिकाणीही अनेकजण मास्क न घालताच फिरत असल्याचेही दिसून आलं. अनेक ठिकाणी सरकारने घालून दिलेल्या सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे उल्लंघन होताना दिसलं.

मध्य प्रदेशमध्येच आतापर्यंत (२० नोव्हेंबर २०२० पर्यंत) करोनाचे एक लाख ८६ हजारांहून अधिक रुग्ण आढळून आले आहेत. राज्यामध्ये करोनामुळे मरण पावलेल्यांची संख्या १२०० हून अधिक आहे. मध्य प्रदेशमध्ये अनेक मोठ्या बाजारपेठांमध्ये प्रशासनाकडून वारंवार करोनासंदर्भातील खबरदारी घेण्याच्या सूचना करण्यात आल्यानंतरही नियमांचे उल्लंघन होताना दिसलं. त्यामुळेच आता सणासुदीच्या कालावधीनंतर शहरातील करोनाबाधितांचा आकडा झपाट्याने वाढताना दिसत आहे. इंदूरमधील अनेक मोठ्या दुकानांमधील कर्मचारी मास्क न घालताच दिसून आले होते. शहरातील एका मिठाईच्या दुकान मालकाच्या कुटुंबातील चार सदस्य करोना पॉझिटिव्ह आढळून आल्याने हे दुकानही पुढील सूचना मिळेपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत.