दिवसभरात ३,१४,८३५ नवे बाधित  

करोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे देशात रुग्णसंख्येचा विस्फोट झाला. देशात गेल्या २४ तासांत ३,१४,८३५ रुग्ण आढळले असून, हा दैनंदिन रुग्णवाढीचा जागतिक उच्चांक आहे.

याआधी दैनंदिन रुग्णवाढीचा जागतिक उच्चांक अमेरिकेत (२,९७,४३०) जानेवारी महिन्यात नोंदवण्यात आला होता. त्यानंतर तिथे रुग्णआलेख घसरू लागला. मात्र, गेल्या पंधरा दिवसांपासून मोठी रुग्णवाढ नोंदवणाऱ्या भारतात गुरुवारी दैनंदिन रुग्णसंख्येने तीन लाखांचा टप्पा पार केला.

देशातील करोनाबाधितांची एकूण संख्या एक कोटी ५९ लाख ३० हजार ९६५ वर पोहोचली आहे. करोनामुक्तांचे प्रमाण ८५ टक्के आहे. देशात दिवसभरात २,१०४ रुग्णांचा मृत्यू झाला असून, आतापर्यंतचा करोनाबळींचा हा उच्चांक आहे. देशातील मृतांचे एकूण प्रमाण १.१६ टक्के आहे.

सलग ४३ व्या दिवशी मोठी रुग्णवाढ नोंदवण्यात आल्याने देशातील उपचाराधीन रुग्णसंख्या २२ लाख ९१ हजार ४२८ झाली आहे. देशात १५ एप्रिलपासून रोज दोन लाखांहून अधिक रुग्णनोंद होत आहे. करोनाच्या दुसऱ्या लाटेने अद्याप शिखर गाठलेले नाही, असे तज्ज्ञांचे मत आहे. त्यामुळे रुग्णआलेख कधी घसरणीला लागेल, याबाबत अनिश्चितता आहे.

मुंबईतील रुग्णसंख्या स्थिर

मुंबई : मुंबईतील रुग्णसंख्या स्थिरावत असल्याचे संकेत आहेत. मुंबईत गेल्या काही दिवसांपासून दैनंदिन रुग्णवाढ सात-आठ हजारांच्या आसपास आहे. गुरुवारी ७ हजार ४१० नवे रुग्ण आढळले. दिवसभरात ७५ रुग्णांचा मृत्यू झाला. मात्र, एका दिवसात नव्या रुग्णांपेक्षा जास्त म्हणजे ८ हजार ९० रुग्ण बरे झाले. आतापर्यंत ५ लाख ११ हजार १४३ म्हणजेच ८४ टक्के रुग्ण करोनामुक्त झाले आहेत.

राज्यात ६७ हजार नवे रुग्ण, ५६८ मृत्यू

मुंबई : राज्यात दिवसभरात करोनाचे ६७,०१३ रुग्ण आढळले असून, ५६८ जणांचा मृत्यू झाला. सलग दुसऱ्या दिवशी ६७ हजारांहून अधिक रुग्णवाढ नोंदली गेली. राज्यातील उपचाराधीन रुग्णांची संख्या सात लाखांच्या आसपास आहे. पुणे जिल्ह््यात सर्वाधिक १ लाख १७ हजार रुग्ण उपचाराधीन आहेत.

दररोज २०० एसटी कर्मचाऱ्यांना करोना

मुंबई : गेल्या पाच ते सात दिवसांत एक हजारहून अधिक एसटी कर्मचारी करोनाबाधित झाले. रोज जवळपास २०० कर्मचाऱ्यांना लागण होत आहे. मात्र, त्यांच्यावरील उपचार, आर्थिक मदत व कामकाजातील बदलांबाबत ठोस निर्णय अद्यापही झालेला नाही.

लसीकरणासाठी बुधवारपासून नोंदणी

नवी दिल्ली : देशात १८ वर्षांवरील सर्वांना १ मेपासून लस देण्यात येणार आहे. त्यासाठी २८ एप्रिलपासून (बुधवार) ‘कोविन’ आणि ‘आरोग्य सेतू’ अ‍ॅपवर नोंदणी करता येईल. लसीकरणासाठी आधार कार्ड आवश्यक आहे.

दोन आठवड्यांत २६ पोलिसांचा मृत्यू

मुंबई : गेल्या दोन आठवड्यांत करोना संसर्ग झालेल्या २६ अधिकारी, अंमलदारांचा मृत्यू झाल्याची माहिती राज्य पोलीस मुख्यालयाने दिली. गेल्या वर्षी मार्चपासून आतापर्यंत ३९० पोलीस करोनाने मृत्युमुखी पडले.