News Flash

किर्गिस्तानमध्ये निवासी भागात विमान कोसळून ३२ ठार

खराब हवामानामुळे झाला अपघात

किर्गिस्तानमध्ये निवासी भागात कार्गो विमान कोसळले.

किर्गिस्तानमध्ये तुर्की एअरलाईन्सचे कार्गो विमान निवासी भागात कोसळल्याने ३२ जणांचा मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेतील मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता असून खराब हवामानामुळे हा अपघात झाल्याचे समजते.

तुर्की एअरलाईन्सचे मालवाहतूक करणारे कार्गो विमान इस्तंबूलवरुन हाँगकाँगच्या दिशेने निघाले होते. या प्रवासादरम्यान विमानाला किर्गिस्तानची राजधानी बिश्केक येथील विमानतळावर थांबा होता. स्थानिक वेळेनुसार सोमवारी सकाळी साडे सातच्या सुमारास विमान लँडींगच्या प्रयत्नात होते. मात्र दाट धुक्यामुळे लँडींगमध्ये अडथळे येत होते. लँडींगच्या प्रयत्नात असताना विमान बिश्केकजवळील गावात कोसळले. विमान कोसळल्याने १५ घरांचे नुकसान झाले आहे. दुर्घटनेमध्ये विमानातील चार वैमानिकांचा मृत्यू झाला आहे. तर २८ स्थानिक नागरिकांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये महिला आणि सहा लहान मुलांचाही समावेश आहे.

विमान कोसळल्याचे वृत्त समजताच घटनास्थळी मदतकार्यासाठी पथक पाठवले आहे. आपातकालीन यंत्रणांनी बचावकार्याला सुरुवात केली आहे अशी माहिती किर्गिस्तानमधील आरोग्य विभागाने दिली. बॉईंग ७४७ हे मालवाहू विमान १४ वर्ष जुने असून सध्या ते तुर्की एअरलाईन्समार्फत चालवले जात होते. दरम्यान, या दुर्घटनेनंतर किर्गीस्तानच्या पंतप्रधानांनी परिस्थितीचा आढावा घेतला. घटनास्थळावर धूराचे लोट दिसत असून मृत्यू झालेल्या वैमानिकांचे नाव अद्याप समजू शकलेले नाही.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 16, 2017 10:48 am

Web Title: 32 dead after turkish cargo plane hits houses in kyrgyzstan
Next Stories
1 कोलकातातील प्रेसिडन्सी विद्यापीठात आग, अग्निशामक दलाचे ६ बंब घटनास्थळी
2 दिनदर्शिकेवर छायाचित्र छापल्याने मोदी नाराज, पंतप्रधान कार्यालयाने मागवला खुलासा
3 आता शक्तिकांत दास ‘अॅमेझॉन’वर भडकले, दिला नीट वागण्याचा इशारा
Just Now!
X