करोना संकटाच्या सावटाखाली कर्नाटकमध्ये दहावीच्या परीक्षा घेण्यात आल्या. करोनाचा संसर्ग टाळण्यासाठी खबरदारी घेतल्यानंतरही एका परीक्षा केंद्रावरील ३२ विद्यार्थी करोना पॉझिटिव्ह आढळून आल्यानं मोठी खळबळ उडाली. सरकारनं शनिवारी याबद्दलची अधिकृत माहिती प्रसिद्ध केली. या विद्यार्थ्यांच्या संपर्कात आलेल्या ८० विद्यार्थ्यांना क्वारंटाइनमध्ये ठेवण्यात आलं आहे.

करोनामुळे शालेय अभ्यासक्रमांपासून ते व्यावसायिक अभ्यासक्रमांपर्यंत सर्वच परीक्षांचं वेळापत्रक कोलमडून पडलं आहे. करोनाचा वाढता प्रसार, दररोज वाढणारी रुग्णसंख्या यामुळे केंद्रीय मनुष्यबळ मंत्रालयासह अनेक राज्यांकडून महत्त्वाच्या परीक्षा लांबणीवर टाकण्यात येत आहे. करोनामुळे विद्यार्थ्यांचं आरोग्य धोक्यात येण्याची भीती असल्यानं अनेक राज्यांनी हा निर्णय घेतला आहे.

दरम्यान, कर्नाटक सरकारनं मार्च एप्रिलमध्ये होणारी दहावीची परीक्षा पुढे ढकलून २५ जून ते ३ जुलै या कालावधीत घेण्याचं निश्चित केलं होतं. ही परीक्षा पूर्ण झाली असून, एका परीक्षा केंद्रावरील ३२ विद्यार्थ्यांना करोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. राज्य सरकारनं याबद्दल अधिकृत माहिती दिली आहे. या विद्यार्थ्यांच्या संपर्कात आलेल्या ८० विद्यार्थ्यांना क्वारंटाइन करण्यात आलं आहे. सरकारनं दिलेल्या माहितीनुसार राज्यातील ३ हजार ९११ विद्यार्थ्यांना कंटेनमेंट झोनमध्ये राहत असल्यानं परीक्षा देता आली नाही. त्याचबरोबर ८६३ विद्यार्थी प्रकृती बरी नसल्यानं गैरहजर होते.

करोनाच्या भीतीपोटी महाराष्ट्रातील परीक्षा अधांतरी

करोनाच्या काळात परीक्षा घेतल्यास विद्यार्थ्यांच्या आरोग्यास धोका उद्भवण्याची भीती असून, महाराष्ट्र सरकारनं विद्यापीठ परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, युजीसीनं नव्यानं परीक्षा घेण्यासंदर्भात मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. राज्यातील करोनामुळे परिस्थिती चिंताजनक आहे. त्यामुळे उच्च व तंत्रशिक्षण मंत्र्यांनी केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाला यासंदर्भात पत्रव्यवहार केला आहे. त्यामुळे राज्यातील परीक्षा होणार की नाही? हा निर्णय सध्यातरी अंधातरीच आहे.