कोलकाताला जात असलेल्या पुरी-हावडा शताब्दी (१२२७८) एक्स्प्रेसमध्ये आयआरसीटीसीकडून देण्यात आलेला नाश्ता खाल्ल्यानंतर सुमारे ३३ प्रवासी आजारी पडले. रेल्वेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने ही माहिती दिली. आजारी प्रवाशांपैकी १४ जणांनी अत्यवस्थ आणि उलटी होत असल्याची तक्रार केल्यानंतर त्यांना काही वेळासाठी रूग्णालयात दाखल करण्यात आले होते.

दक्षिण पूर्व रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी संजय घोष यांनी सांगितले की, रेल्वे पश्चिम मिदनापूर जिल्ह्यातील बेल्दा स्थानकावर पोहोचल्यानंतर सुरूवातीला दोन प्रवाशांना अस्वस्थ वाटू लागले. त्यांनी उलटी केली. या प्रवाशांवर उपचार करण्यासाठी डॉक्टरांना बोलावण्यात आले. नंतर सुमारे १५ प्रवाशांनीही हीच तक्रार केली. रेल्वे खडगपूर स्थानकावर सुमारे एक तासासाठी थांबवून आजारी प्रवाशांवर उपचार करण्यात आले.

पीडित प्रवाशाने सांगितले की, भारतीय रेल्वे खानपान आणि पर्यटन विभागाकडून (आयआरसीटीसी) देण्यात आलेल्या नाश्त्यानंतर हा प्रकार घडला. भुवनेश्वर स्थानक सोडल्यानंतर प्रवाशांना ऑमलेट आणि ब्रेड खाण्यास देण्यात आले. ते खाल्ल्यानंतरच प्रवाशांना त्रास सुरू झाला.

आयआरसीटीसीने नाश्त्याचे नमुने तपासासाठी पुढे पाठवले आहेत. अहवाल आल्यानंतरच सर्व बाब उजेडात येईल. रेल्वेतील सुमारे ५०० प्रवाशांना नाश्ता देण्यात आला होता. परंतु, सर्वांनीच खराब अन्नाची तक्रार केली नाही.