ऑगस्टपासून इजिप्तमध्ये पुन्हा एकदा हिंसाचाराच्या घटनांमध्ये वाढ होऊ लागली असून, कट्टरपंथीय मोर्सी समर्थक आणि पोलिसांमध्ये झालेल्या ताज्या हिंसाचारात किमान ३४ जण ठार झाले आहेत. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता असून गेल्या दीड महिन्यात किमान हजार जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. सोमवारी झालेल्या हिंसाचाराच्या घटनांमध्ये २०९ जण जखमी झाले आहेत.
१९७३ मधील अरब-इस्रायली युद्धाचा स्मृतिदिन साजरा करण्यासाठी इजिप्तचे पदच्युत राष्ट्रप्रमुख मोहम्मद मोर्सी यांचे समर्थक येथील कैरो चौकामध्ये गोळा झाले होते. त्या वेळी झालेल्या संघर्षांत ३० जणांचा मृत्यू झाला, तर दक्षिणेकडील भागात झालेल्या संघर्षांत ४ जण ठार झाले. मात्र मृतांमध्ये पोलिसांचा समावेश नसल्याचे सरकारी सूत्रांतर्फे स्पष्ट करण्यात आले.
पदच्युत करण्यात आलेले माजी राष्ट्रप्रमुख मोर्सी व त्यांचे समर्थक यांच्याविरोधात लष्कराने धडक मोहीम हाती घेतली आहे. कट्टरपंथाचे समर्थन करणारी मोर्सीप्रणीत मुस्लीम ब्रदरहूड चळवळ दडपण्याचा प्रयत्न लष्कराकडून केला जात आहे. तर मोर्सी समर्थक विद्यमान लष्करी सत्तेविरोधात व्यापक चळवळ उभारण्याचा प्रयत्न करीत आहेत.
१४ ऑगस्टपासून सुरू झालेल्या या संघर्षांत आतापर्यंत हजाराहून अधिक जणांना जीव गमवावा लागला आहे. गेला आठवडाभर शहरात केवळ गोळीबाराचाच आवाज प्रतिध्वनित होत आहे. तसेच सारे शहर अश्रुधुराने भरून गेले आहे. दरम्यान, सुएझ कालव्याच्या परिसरातही संघर्षांची ठिणगी पडली असल्याचे पोलिसांनी सांगितले.