महाराष्ट्रासह काही राज्यातील करोना परिस्थिती गंभीर होत आहे. काही राज्यात झालेल्या करोना उद्रेकाने केंद्राच्या चिंतेत भर टाकली आहे. केंद्र सरकारकडून तीन राज्यात तज्ज्ञांची ५० पथकं तैनात करण्यात आली असून, परिस्थितीचा आढावा घेतला जात आहे. यात महाराष्ट्रासाठी चिंतेची बाब म्हणजे देशातील एकूण रुग्णसंख्येपैकी ५८ टक्के रुग्ण महाराष्ट्रातील आहे. तर मृत्यूचीही संख्याही मोठी आहे.

केंद्रीय आरोग्य सचिन राजेश भूषण यांनी पत्रकार परिषदेत देशातील करोना परिस्थितीची माहिती दिली. केंद्रीय आरोग्य सचिव भूषण म्हणाले, “देशात सर्वाधिक करोना रुग्णसंख्या असलेल्या पहिला दहा जिल्ह्यांमध्ये महाराष्ट्रातील सात जिल्ह्यांचा समावेश आहे. एक जिल्हा कर्नाटकातील आहे. तर छत्तीसगढ आणि दिल्लीतीलही एका जिल्ह्याचा टॉप टेनमध्ये समावेश आहे,” अशी माहिती भूषण यांनी दिली.

आणखी वाचा- आठवड्याचा लॉकडाउन परिणामकारक नाही; केंद्राने महाराष्ट्राला दिला होता सल्ला

“पंजाब आणि छत्तीसगढमध्ये वाढती मृत्यूसंख्या चिंतेची बाब आहे. देशातील एकूण रुग्णसंख्येपैकी ५८ टक्के उपचाराधीन रुग्ण महाराष्ट्रातील आहेत. तर मृत्यूचं प्रमाण ३४ टक्के आहे. महाराष्ट्रात गेल्या काही आठवड्यांपासून आरटी-पीसीआर चाचण्या घटल्या आहेत. आरोग्य मंत्रालयाने महाराष्ट्र सरकारला आरटी-पीसीआर चाचण्या वाढवण्याचा सल्ला दिला आहे. सध्या फक्त ६० टक्के आरटी-पीसीआर चाचण्या महाराष्ट्रात होत असून, त्या ७० टक्क्यांच्या पुढे घेऊन जाण्याचं राज्य सरकारला सांगण्यात आलं आहे,” असं भूषण यांनी सांगितलं.

महाराष्ट्रासह तीन राज्यात ५० पथकं

देशातील वाढत्या रुग्णसंख्येनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ८ एप्रिल रोजी सर्व मुख्यमंत्र्यांची बैठक बोलावली आहे. त्याचबरोबर रविवारी झालेल्या उच्च स्तरीय बैठकीत पंतप्रधानांनी कोविड प्रभावित राज्यांमध्ये तज्ज्ञांची केंद्रीय पथके पाठवण्याची सूचना केली होती. त्याप्रमाणे केंद्राने ५० पथकं तयार करून ती महाराष्ट्र, छत्तीसगढ आणि पंजाबमध्ये पाठवण्यात आलेली आहेत.