कर्मचाऱ्यांच्या वेतनातून ‘पीएम केअर्स’ला २०५ कोटी

श्यामलाल यादव, एक्स्प्रेस वृत्तसेवा

नवी दिल्ली : केंद्रीय शिक्षण संस्थांनीच नव्हे, तर बँकींग आणि वित्तसंस्थांनी ‘पीएम केअर्स फंड’ला भरघोस निधी दिल्याचे स्पष्ट झाले आहे. रिझव्‍‌र्ह बँक, सार्वजनिक क्षेत्रातील किमान सात बँका, अन्य सात वित्तीय संस्थांतील कर्मचाऱ्यांच्या वेतनातून एकूण २०४.७५ कोटी रुपये ‘पीएम केअर्स फंड’मध्ये जमा करण्यात आल्याची माहिती ‘इंडियन एक्स्प्रेस’ला माहितीच्या अधिकारातून मिळाली आहे.

भारतीय आयुर्विमा महामंडळ, सर्वसाधारण विमा महामंडळ आणि नॅशनल हाऊसिंग बँक यांनी सामाजिक दायित्व निधी आणि अन्य तरतुदींमधून स्वतंत्रपणे १४४.५ कोटी रुपयांचे योगदान ‘पीएम केअर्स फंड’मध्ये दिले. ‘इंडियन एक्स्प्रेस’ने माहितीच्या अधिकारात विचारलेल्या प्रश्नांना प्रतिसाद देणाऱ्या १५ शासकीय बँका आणि वित्तसंस्थांनी एकूण ३४९.२५ कोटी रुपये ‘पीएम केअर्स फंडा’त जमा केल्याचे स्पष्ट झाले आहे.

भारतीय आयुर्विमा महामंडळाने सर्वाधिक म्हणजे ११३.६४ कोटी रुपये विविध वर्गवारीखाली ‘पीएम केअर्स फंडा’त जमा केले. त्यातील ८.६४ कोटी कर्मचाऱ्यांच्या वेतनातून देण्यात आले आहेत. तसेच १०० कोटी आणि ५ कोटींचा निधी महामंडळाने मार्चमध्ये दिला होता.

सार्वजनिक क्षेत्रातील बॅंकांमध्ये देणगीदारांत भारतीय स्टेट बँकेचा पहिला क्रमांक आहे. एसबीआयने या फंडात १०७.९५ कोटी रुपये जमा केले. ही सर्व रक्कम कर्मचाऱ्यांच्या वेतनातून जमा करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे रिझव्‍‌र्ह बँकेनेही कर्मचाऱ्यांच्या वेतनातून ७.३४ कोटी रुपये जमा केल्याचे म्हटले आहे.

करोनाच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर ‘पीएम केअर्स फंड’ २८ मार्च रोजी स्थापन करण्यात आला. या फंडमध्ये ३१ मार्चपर्यंत ३,०७६.६२ कोटी जमा करण्यात आले होते. त्यापैकी ३,०७५.८५ कोटी रुपये ‘स्वेच्छा निधी’ असल्याचे सांगण्यात आले होते.

‘पीएम केअर्स फंड’चे व्यवस्थापन पंतप्रधान कार्यालयामार्फत केले जाते. ‘पीएम केअर्स फंड’ ही माहिती अधिकारांतर्गत सार्वजनिक प्राधिकारण नसल्याचे नमूद करत पंतप्रधान कार्यालयाने या फंडातील देणगीदारांचा तपशील देण्यास नकार दिला होता.