इराणचा टॉप लष्करी कमांडर कासिम सुलेमानीच्या अंत्ययात्रेदरम्यान चेंगराचेंगरी झाली आहे. यामध्ये ३५ जण ठार झाले असून ४८ जण जखमी झाल्याची माहिती आहे. अमेरिकेने शुक्रवारी पहाटे केलेल्या एअर स्ट्राइकमध्ये जनरल कासिम सुलेमानीचा मृत्यू झाला. केरमानमध्ये मंगळवारी सकाळी कासिन सुलेमानी यांची अंत्ययात्रा निघाली होती. त्या दरम्यान ही चेंगराचेंगरीची घटना घडली. इराणी वाहिनीने हे वृत्त दिले आहे.

सोमवारी इराणची राजधानी तेहरानमध्ये कासिम सुलेमानी यांचे पार्थिव आणले होते. त्यावेळी १० लाखापेक्षा जास्त लोक जमले होते. कासिम सुलेमानी कद्स फोर्सचा प्रमुख होता. शुक्रवारी बगदाद विमानतळाजवळ अमेरिकेने केलेल्या हवाई हल्ल्यात त्याचा मृत्यू झाला. कासिम सुलेमानी इराणमध्ये लोकप्रिय होता. त्याच्याबद्दल सर्वसामान्य इराण जनतेमध्ये आदराची भावना होती.

जनरल सुलेमानी कोण होते?
कासिम सुलेमानी इराणच्या इस्लामिक रेव्होल्युशनरी गार्ड फोर्सचा प्रमुख होता. गेल्यावर्षी एप्रिलमध्ये अमेरिकेने इराणच्या या आयआरजीसी फोर्सला दहशतवादी संघटनेचा दर्जा दिला होता. सुलेमानी यांच्या नेतृत्वाखाली काम करणारी कद्स फोर्स परदेशात इराणसाठी वेगवेगळया गुप्त मोहिमांची अंमलबजावणी करायची.

सुलेमानी यांच्याकडे १९९८ सालापासून कद्स फोर्सचे नेतृत्व होते. गुप्त माहिती गोळा करण्याबरोबरच कद्स फोर्स परदेशात लष्करीमोहिमा पार पाडते. त्याशिवाय सुलेमानी हे इराणचे सर्वोच्च नेते आयातुल्ला अली खामेनी यांचे अत्यंत विश्वासू सहकारी होते. इराणचे भविष्यातील नेते म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात होते.

अमेरिकन सैन्यासंबंधी काय निर्णय घेतला?
अमेरिका आणि इराणचे संबंध धोकादायक पातळीला पोहोचले असून, दोन्ही देशांमध्ये युद्ध सुद्धा भडकू शकते अशी स्थिती आहे. आता इराणने अमेरिकेच्या सर्व सैन्यदलांना दहशतवादी घोषित केले आहे. इराणचे मंत्री मोहम्मद जावाद अझारी जाहरोमी यांनी ट्रम्प यांना ‘सूटातला दहशतवादी’ म्हटले आहे.