भाजपाने गुरुवारी लोकसभेसाठी १८४ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली असून यापैकी ३५ जणांवर गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आली आहे. यात सर्वाधिक गुन्हे दाखल असणाऱ्यांमध्ये महाराष्ट्रातील चंद्रपूरमधील खासदार हंसराज अहिर यांचे नाव अग्रस्थानी असून त्यांच्यावर ११ गुन्हे दाखल आहेत. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याविरोधात एकूण पाच गुन्हे दाखल आहेत. उमेदवारांच्या प्रतिज्ञापत्रांचा अभ्यास करणाऱ्या ‘मायनेता डॉट इन्फो’च्या हवाल्याने ही माहिती समोर आली आहे.

न्यूज १८ ने दिलेल्या वृत्तानुसार भाजपाच्या पहिल्या यादीमधील ७८ जणांना २०१४ मध्येही उमेदवारी देण्यात आली होती. याच ७८ जणांपैकी ३५ जणांनी आपल्या प्रतिज्ञापत्रामध्ये गुन्ह्यांसंदर्भातील माहिती दिली होती. मात्र पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात उतरणाऱ्या १०६ उमेदवारांनी कोणत्याही प्रकारचे प्रतिज्ञापत्र याआधी सादर केलेले नसल्याने त्यांच्यावरील गुन्ह्यांसंदर्भातील कोणतीही माहिती उपलब्ध नसल्याचे न्यूज १८ ने म्हटले आहे. या १०६ उमेदवारांनी प्रतिज्ञापत्र सादर केल्यावर गुन्हेगारी पार्श्वभूमी असणाऱ्या पहिल्या यादीतील उमेदवारांची आकडेवारी वाढण्याची शक्यता व्यक्त केली आहे.

‘मायनेता डॉट इन्फो’ने दिलेल्या माहितीनुसार सर्वाधिक गुन्ह्यांची नोंद असणारा भाजपाचा उमेदवार महाराष्ट्रातील आहे. चंद्रपूर मतदार संघातून २०१४ साली निवडणूक लढणाऱ्या हंसराज गंगाराम अहिर यांच्याविरोधात ११ गुन्ह्यांची नोंद आहे. आपल्या प्रतिज्ञापत्रामध्ये त्यांनी २०१४ साली उमेदवारी दाखल करताना ही माहिती दिली आहे. सध्या अहिर हे चंद्रपूरचे खासदार असून ते गृहराज्यमंत्री आहेत. सर्वाधिक गुन्ह्यांची नोंद असणाऱ्या भाजपा उमेदवारांच्या यादीमध्ये आहिर यांच्याखालोखाल ओडिसामधील प्रताप सारंगी यांचा क्रमांक लागतो. सारंगी यांच्या नावावर १० गुन्ह्यांची नोंद आहे.

गुन्ह्यांची नोंद असणाऱ्या उमेदवारांच्या यादीमध्ये केंद्रिय मंत्री नितीन गडकरी यांचाही समावेश आहे. गडकरी यांच्याविरोधात पाच गुन्ह्यांची नोंद आहे. २०१४ साली त्यांनी दिलेल्या प्रतिज्ञापत्रामध्ये हे नमूद करण्यात आले होते. भाजपाचे खासदार साक्षी माहराज यांच्याविरोधातही आठ गुन्ह्यांची नोंद आहे. भाजपाने जाहीर केलेल्या पहिल्या यादीमध्ये १८ महिला उमेदवारांचा समावेश असून पुढील काही दिवसांमध्ये भाजपा आपल्या उमेदवारांची दुसरी यादी जाहीर करणार आहे.

२०१४ च्या निवडणुकांनंतर असोसिएशन ऑफ डेमोक्रॅटिक रिफॉर्म्सने (एडीआर) निवडणुक जिंकणाऱ्या ५४३ खासदारांपैकी ५४२ खासदारांच्या प्रतिज्ञापत्रांचा अभ्यास केला. त्यांनी केलेल्या पहाणीमध्ये सर्वाधिक गुन्ह्यांची नोंद असणाऱ्या निवडूण आलेल्या खासदारांच्या यादीमध्ये भाजपाचे सर्वाधिक खासदार आहेत. १६ व्या लोकसभेतील भाजपाच्या २८२ खासदारांपैकी ९८ खासदारांविरोधात गुन्ह्यांची नोंद असल्याचे या प्रतिज्ञापत्रांमधून दिसून आले. म्हणजेच गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या सध्याच्या भाजपा खासदारांची आकडेवारी ही ३५ टक्के इतकी आहे. तर दुसरीकडे काँग्रेसच्या ४४ खासदारांपैकी ८ खासदारांविरोधात गुन्ह्यांची नोंद असल्याचे ‘एडीआर’ने आपल्या अहवालात म्हटले आहे. तसेच गुन्हेगारी पार्श्वभूमी असणारे उमेदवार हे स्वच्छ प्रतिमेच्या उमेदवारांपेक्षा निवडणूक जिंकण्याची शक्यता दुप्पटीने जास्त असते असंही ‘एडीआर’ने म्हटले आहे. गुन्ह्यांची नोंद असणाऱ्या उमेदवारांच्या विजयाची शक्यता ही १३ टक्के असते तर स्वच्छ प्रतिमेच्या उमेदवाराच्या विजयाची शक्यता अवघी ५ टक्के असते असं या अभ्यासानंतर सादर करण्यात आलेल्या अहवालात नमूद करण्यात आले आहे.

भाजपाने जाहिर केलेल्या उमेदवारांच्या पहिल्या यादीमध्ये अनेक दिग्गज नेत्यांच्या नावांचा समावेश आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पुन्हा एकदा वाराणसी मतदारसंघातून उभे राहणार आहेत. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांना गांधीनगर तर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना नागपूर मतदारसंघातून उमेदवारी जाहीर झाली आहे. केंद्रीय मंत्री स्मृती इराणी या पुन्हा एकदा काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांच्याविरोधात अमेठी मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत.