प्रत्येकजण त्यांना टोनी या नावानं हाक मारतो. काही स्रिया आपल्या मुलांसह तिच्यासोबत सेल्फीही घेतात आणि रस्त्यावर फेरीवाले भेटवस्तू म्हणून त्यांच्या हातात ब्रेसलेट्सही घालतात. कलाकार तिचे चित्र रेखाटतात आणि ते सोशल मीडियावर शेअरही करतात. टीव्ही नेटवर्क मुलाखती घेतात आणि “मारिया अँटोनिएटा अल्वा कोण आहेत?” हे माहितीये का असा सवालही करतात. खरंच माहितीये का कोण आहेत मारिया अँटोनिएटा अल्वा?

काही दिवसांपूर्वी फार कमी जण त्यांना ओळखत होते. ३५ वर्षीय मारिया या पेरू या देशाच्या अर्थमंत्री आहेत. लोकांसोबत उत्तम समन्वय, याव्यतिरिक्त करोनाविरोधातील लढ्यात छोट्या व्यापाऱ्यांसाठी आणि गरीब कुटुंबीयांसाठी जाहीर केलेल्या मदतीत त्यांची महत्त्वाची भूमिका होती. मंत्रिमंडळात झालेल्या फेरबदलानंतर ऑक्टोबर २०१९ मध्ये मारिया यांच्याकडे अर्थमंत्रालयाची धुरा सोपवण्यात आली. २००८ मध्ये युनिव्हर्सिटेड डेल पॅसिफिकोमधून त्यांनी अर्थशास्त्राची पदवी प्राप्त केली. त्यानंतर २०१० मध्ये त्या पेरूच्या अर्थमंत्रालयात सहभागी झाल्या. २०१४ मध्ये हार्वर्ड विद्यापीठातून ‘इंटरनॅशनल डेव्हलपमेंट’मध्ये त्यांनी पब्लिक अॅडमिनिस्ट्रेशनची शिष्यवृत्ती मिळवली आणि पदव्युत्तर पदवी घेतली.

काय आहे भारतीय कनेक्शन

मारिया यांचं भारताशीही एक नातं आहे. मुलींच्या शिक्षणातील संधींचं अध्ययन करण्यासाठी त्या दोन महिन्यांसाठी भारतात आल्या होत्या. पेरूमध्ये परतल्यानंतर त्यांनी शिक्षण मंत्रालयासोबत काम केलं. त्यानंतर त्यांनी योजना आणि अर्थसंकल्पाच्या प्रमुख म्हणूनही काम केलं आणि नंतर अर्थमंत्रालयाच्या अर्थसंकल्पिय प्रमुख म्हणून त्या काम करू लागल्या. त्यांना खुप कष्टाळू, संयमी आणि अर्थमंत्रालयात सर्वांच्या आवडत्या व्यक्ती आहेत, असं मत अर्थमंत्रालयाती माजी अधिकारी पाब्लो सिकदा यांनी व्यक्त केलं होतं.

गेल्या वर्षी मंत्रिमंडळात त्यांची नियुक्ती झाल्यापासून राष्ट्राध्यक्ष मार्टिन विजकार्रा यांच्या टीममधील नव्या पिढीतील युवा नेत्यांमधील एक महत्त्वाच्या व्यक्ती म्हणून मारिया यांच्याकडे पाहिले जात आहे. सार्वजनिक धोरणांची व्याख्या स्पष्ट केल्याबद्दल त्याचे सर्वत्र कौतुकही केलं जात आहे. “त्यांची संवाद साधण्याची क्षमता उत्तम आहे आणि सद्यस्थितीत ते महत्त्वाचंदेखील आहे,” असं मत मारिया यांचे माजी सहकारी कार्लोस ओलिव यांनी सांगितलं.

लहान वयातच परिस्थितीची जाणीव

मारिया यांचे वडिल जॉर्ज अल्वा सिव्हिल इंजिनिअर होते. आपल्या वडिलांसोबत त्यांनी पेरूतील अंतर्गत भागांमधील स्थितीत पाहिली. लहान वयातच अल्वाला पेरुमधील अत्यंत गरीबीची जाणीव झाली. परंतु आता त्यांनी पेरूतील परिस्थिती बदलण्यावर लक्ष केंद्रीत केलं आहे. अर्थमंत्रालयातील सुरूवातीच्या काळात त्यांनी पायाभूत सुविधांमधील मंदी रोखण्यासाठी प्रयत्न केले. त्यांच्या प्रयत्नांनंतर सार्वजनिक गुंतवणुकीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली. त्यांनी आरोग्य, शिक्षण आणि पायाभूत सुविधांमधील कमतरतांवर अधिक काम करण्याचा निर्णय घेतला. करोनानं जगभरात थैमान घातलं आहे. परंतु अनेक समस्यांचा सामना करत असतानाही पेरूने कठोर पद्धतीनं लॉकडाउन लागू केला. मारिया यांनी आपलं संपूर्ण लक्ष कॅन्टोन्मेंटवर केंद्रीत केलं. कुटुंबांना आणि व्यवसायांना मदत पुरविण्यावरही त्यांनी काम केलं आहे आणि या महिन्यात लॉकडाउन शिथिल केल्यानंतर व्यवसाय पुन्हा सक्रिय करण्याची योजनाही त्यांनी तयार केली आहे.