जपानमध्ये नांगर टाकून असलेल्या डायमंड प्रिन्सेस या क्रूझ जहाजावर करोना विषाणूची लागण झालेल्यांची संख्या आता ३५५ झाली असून अमेरिका, कॅनडा, हाँगकाँग या देशाच्या नागरिकांना परत नेण्याची व्यवस्था संबंधित देश करणार आहेत. भारताचेही काही प्रवासी त्यात अडकून पडले आहेत त्यांची सोडवणूक करण्याचे आश्वासन जपानमधील भारतीय दूतावासाने दिले आहे.

जपानचे आरोग्यमंत्री कात्सुनोबू काटो यांनी सांगितले की, जहाजावर आणखी ७० रुग्ण सापडले असून त्यामुळे एकूण रुग्णांची संख्या आता ३५५ झाली आहे. एकूण १२१९ जणांच्या चाचण्या करण्यात आल्या असून त्यातील ३५५ जणांच्या चाचण्या सकारात्मक आल्या आहेत म्हणजे त्यांना संसर्ग झालेला आहे.

या जहाजावर एकूण ३७०० प्रवासी आहेत. त्यात पन्नासहून अधिक देशांचे कर्मचारी आहेत. हे जहाज सध्या जपानमध्ये असून तेथे ते वेगळे ठेवण्यात आले आहेत.

आणखी दोन भारतीयांना लागण

जपानमध्ये नांगर टाकून असलेल्या डायमंड प्रिन्सेस जहाजावर आणखी दोन भारतीयांना करोना विषाणूचा संसर्ग झाला असून भारतीय दूतावासाने जहाजावरील भारतीयांना मदतीचे आश्वासन दिले आहे. चाचण्या नकारात्मक आलेल्या लोकांनाच भारतात नियमानुसार परत नेता येईल असे दूतावासाने म्हटले आहे. जहाजावर एकूण १३८ भारतीय असून त्यात १३२ कर्मचारी व ६ प्रवासी आहेत.