उत्तर प्रदेशामध्ये दूरसंचार शाखेने शिपाई-संदेशवाहक पदासाठी जाहिरात दिली, या पदासाठी किमान पात्रता पाचवी उत्तीर्ण अशी असताना नोकरीसाठी ३७०० पीएच डीधारकांनी अर्ज केल्याची बाब उघड झाली आहे. जवळपास ६२ पदे रिक्त असून त्यासाठी ९३ हजार अर्ज आले आहेत. पदवधारक, बीटेक पदवीधर यांची संख्याही मोठय़ा प्रमाणावर आहे.

विभागाने दिलेल्या माहितीनुसार, १२ वर्षांनंतर या ६२ पदांची भरती करण्यात येत आहे. सदर नोकरी पोस्टमनप्रमाणे आहे. या पदावरील व्यक्तीला पोलीस टेलिकॉम विभागाचे निरोप एका कार्यालयातून दुसऱ्या कार्यालयात पोहोचवायचे आहेत. या व्यक्तीला सायकल चालविता येते की नाही हे पाहिले जाते, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. या पदासाठी लेखी परीक्षा घेण्याचा विचार सुरू झाला आहे.

या अर्जाची मुदत १६ ऑगस्टपर्यंत होती, या व्यक्तीला २० हजार रुपये इतके मासिक वेतन असून ही पूर्णवेळ सरकारी नोकरी आहे. त्यामुळे बेरोजगारांच्या या नोकरीवर उडय़ा पडल्या आहेत. जास्त शिकलेले उमेदवार मिळाले तर त्यांच्याकडून आम्ही इतर कामेही करून घेऊ आणि त्यांना पदोन्नतीही लवकर मिळेल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.