दक्षिण भारतातील ऐतिहासिक किनाऱ्याचे शहर म्हणून ओळख असलेल्या मद्रास, अर्थात चेन्नई शहराचा शुक्रवारी ३७५वा वाढदिवस मोठय़ा उत्साहात आणि दिमाखात साजरा करण्यात आला.
मद्रास दिनानिमित्त शहरात विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. त्यासाठी गेल्या १७ ऑगस्टपासून स्वयंसेवकांनी जय्यत तयारी सुरू केली होती. यात राज्यातील इतिहासकारांनीही मोठय़ा हिरिरीने सहभाग घेतला होता. २२ ऑगस्ट १६३९ रोजी मद्रास शहर अस्तित्वात आल्याचे सांगण्यात येते. ब्रिटिश काळात या शहराचे ‘मद्रास’ असे नामकरण करण्यात आले. त्यामुळे या नावाबरोबर इतिहासातील अनेक आठवणी जपल्या गेल्या आहेत. द्रमुक पक्षाने १९९६ साली सत्तेवर आल्यानंतर ‘मद्रास’ शहराचे ‘चेन् नई’ असे नामकरण केले.
एके काळी शांत शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चेन्नईचा चेहरामोहरा पूर्णपणे बदलला आहे. शहरात गगनचुंबी इमारती झपाटय़ाने उभ्या राहत आहेत. मॉल आणि माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील अनेक कार्यालये, तसेच अन्य उद्योगांनी शहराच्या सीमा वाढल्या आहेत.
 शहरातील कधी काळी परंपरेने चहापाण्यावर विश्रांती भागवणारी वयस्क मंडळी सध्याच्या तरुणांसोबत कॉफी आणि कपॅचिनोसोबत कॅफेमध्ये ऊठबस करीत आहेत. हे येथील बदलले चित्र आधुनिकतेची झलक देत आहे.
मद्रासवर शब्द-चित्र प्रदर्शन
मद्रासचा वारसा चित्र आणि शब्दरूपांत मांडणारी अनेक प्रदर्शने शुक्रवारी चेन्नईत भरली होती. इतिहासप्रेमींची त्यासाठी मोठी झुंबड उडाली होती. जुन्या मद्रासवरील छायाचित्रांची अनेक प्रदर्शने भरली होती. येथील दूरचित्रवाहिनी आणि वृत्तवाहिन्यांवर मद्रासशी संबंधित अनेक घटनांवरील चित्रांकन केलेले कार्यक्रमांचे प्रसारण करण्यात आले.