मध्य चीनमधील हेनान प्रांतातील वृद्धाश्रमात लागलेल्या आगीत ३८ वृद्ध जळून मरण पावले तर इतर सहा जण जखमी झाले आहेत, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

लुशान परगण्यात पिंगडिंगशान शहरात काल सायंकाळी वृद्धाश्रमात आग लागली नंतर ती संपूर्ण संकुलात पसरली. तेथे ५१ वृद्ध लोक राहत होते. रात्री ८.२२ वाजता ही आग विझवण्यात यश आले. आगीचे कारण समजू शकले नाही व आगीत अडकलेल्यांना सोडवण्याचे प्रयत्न चालू आहेत. आगीतून वाचलेल्या श्रीमती याझो युलान यांनी सांगितले, की आपण ज्या खोलीत राहत होतो. तेथे आणखी ११ जण वास्तव्यास होते. आपण व आणखी एक जण यातून वाचण्यात यशस्वी झालो.
२०१० मध्ये या वृद्धाश्रमास परवानगी देण्यात आली होती. दोन हेक्टर परिसरात हा वृद्धाश्रम होता. वृद्धांची काळजी घेणे हे चीनपुढील मोठे आव्हान असून २०१४ च्या आकडेवारीनुसार तेथे १५.५ टक्के वृद्ध लोक आहेत. २०३० पर्यंत चार चिनी लोकांपैकी एक जण साठ वर्षे वयावरील असेल.
फेब्रुवारीत अशाच अपघातात नऊ वर्षे वयाच्या मुलाने लायटर पेटवल्याने बहुमजली किरकोळ विक्री बाजारात आग लागून १७ जण ठार झाले होते. दरम्यान गेल्याच महिन्यात वादग्रस्त रासायनिक प्रकल्पाजवळ राहणाऱ्या ३० हजार लोकांना आग लागल्यानंतर सुरक्षित ठिकाणी हलवले होते.