अमेरिकेच्या इतिहासातील सर्वाधिक भीषण नैसर्गिक आपत्ती

अमेरिकेच्या इतिहासातील सर्वाधिक भीषण नैसर्गिक आपत्ती ठरलेल्या टेक्सास आणि लुसियाना या प्रांतांतील ‘हार्वे’ चक्रीवादळातील मृतांचा आकडा ३८वर पोहोचला असून जवळपास १६० दशलक्ष अमेरिकी डॉलरचे आर्थिक नुकसान झाले आहे. त्याचप्रमाणे हजारो लोक बेघर झाले आहेत.

‘हार्वे’ चक्रीवादळाचा पहिला तडाखा टेक्सास प्रांताला बसला होता. पाच दिवसांनंतर म्हणजेच बुधवारी लुसियाना प्रांताला या वादळाचा फटका बसला. या भागात मुसळधार पावसामुळे महापूर आला आहे. ‘हार्वे’ वादळामुळे अमेरिकेच्या इतिहासातील सर्वाधिक पाऊस पडला असून तो ५२ इंचांपेक्षाही अधिक आहे. वादळ, पाऊस, पूर या आपत्तींमध्ये आतापर्यंत ३८ जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच टेक्सास आणि लुसियाना प्रांतात वेगवान वारे वाहत असल्याचे एका अधिकाऱ्याने न्यूयॉर्क टाइम्सला सांगितले आहे.

ह्यूस्टन पोलीसप्रमुख आर्ट अॅसेव्हेडो यांनी २० जण अद्याप बेपत्ता असल्याचे म्हटले आहे. अमेरिकेतील चौथ्या क्रमांकाचे मोठे शहर असलेल्या ह्यूस्टन येथे पूरस्थिती असून काही भागांतील परिस्थिती पूर्वपदावर येत असल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. ह्यूस्टन भागात एकाच कुटुंबातील सहा जण वाहून गेल्याचे पोलिसांनी सांगितले. ३२ हजार नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले आहे, अशी माहिती टेक्सासचे गव्हर्नर ग्रेग अॅबॉट यांनी सांगितले.

या वादळामुळे अमेरिकेच्या इतिहासातील सर्वाधिक आर्थिक नुकसान झाले आहे. बेघर झालेल्यांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत. बचाव पथके टेक्सास आणि लुसियाना प्रांतात अहोरात्र झटत आहेत. टेक्सास आणि लुसियाना प्रांतात पूरस्थिती कायम राहणार असल्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे.

चक्रीवादळानंतर विविध अपघातांमध्ये मृत्युमुखी पडलेल्यांपैकी वाहने पुरात वाहून गेल्याने मृत्यू झालेल्यांचे प्रमाण अधिक आहे. स्वोलेन तलावात वाहून गेल्याने बुधवारी एका भारतीय विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला होता. टेक्सास प्रांतात भारतीय वंशाचे एक लाख नागरिक राहत असून त्यांनाही या वादळाचा मोठा फटका बसला आहे.

टेक्सासमधील रासायनिक प्रकल्पात दोन स्फोट

ह्यूस्टन : ‘हार्वे’ चक्रीवादळाचा फटका बसल्यामुळे मुसळधार पाऊस आणि पूरस्थिती असलेल्या टेक्सासमधील क्रॉस्बे येथील रासायनिक प्रकल्पात दोन स्फोट झाले, अशी माहिती या प्रकल्पातील अधिकाऱ्याने दिली आहे. स्थानिक वेळेनुसार पहाटे २ वाजता आपत्कालीन पथकाला दोन स्फोट झाल्यानंतर धुराचे लोट उसळल्याचे आढळून आले. सावधगिरीचा उपाय म्हणून या प्रकल्पाजवळील तीन किलोमीटरच्या परिसरातील नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले आहे. चक्रीवादळ आणि मुसळधार पावसामुळे या प्रकल्पाजवळ सुरक्षेच्या दृष्टीने काळजी घेतली जात असल्याचे, संबंधित अधिकाऱ्याने सांगितले.

५८ अब्ज डॉलर्सचे नुकसान

पॅरिस : अद्यापही पाण्याने भरलेल्या आणि पावसाचा तडाखा सोसत असलेल्या अमेरिकेतील टेक्सास प्रांताला ‘हार्वे’ या चक्रीवादळामुळे झालेले आर्थिक नुकसान ५८ अब्ज अमेरिकी डॉलर्सच्या (४९ अब्ज युरो) जवळपास असावे, असे जर्मनीतील आपदा विश्लेषकांनी गुरुवारी जारी केलेल्या अहवालात म्हटले आहे.

हा अंदाज खरा ठरला, तर हार्वे ही १९०० सालानंतरची नवव्या क्रमांकाची सर्वाधिक खर्चिक अशी नैसर्गिक आपत्ती ठरेल, असे जर्मनीतील सेंटर फॉर डिझास्टर मॅनेजमेंट अँड रिस्क रिडक्शन टेक्नॉलॉजी (सीईडीआयएम) ने म्हटले आहे. ‘हार्वे’ने केलेले नुकसान फार मोठे म्हणजे सुमारे ५८ अब्ज डॉलर्सचे असून, त्यापैकी ९० टक्क्य़ांहून अधिक नुकसान पुरामुळे झाले आहे, असे संस्थेतील सीनियर रिस्क इंजिनीयर आणि फॉरेन्सिक डिझास्टर अॅनालिसिस ग्रूपचे प्रमुख जेम्स डॅनियल यांनी सांगितले.