News Flash

६०० मुलींवर अत्याचाराचा प्रयत्न करणा-या ३८ वर्षीय नराधमाला अटक

ऑगस्ट २०१६ मध्येच सुनील रस्तोगी हा तुरुंगातून बाहेर आला होता.

नराधम सुनील रस्तोगी

दिल्लीत सात वर्षीय चिमुरडीवर बलात्कार करणा-या ३८ वर्षीय नराधमाला पोलिसांनी अटक केली आहे. या नराधमाने दिल्ली आणि गाझियाबाद येथे शाळेत जाणा-या लहान मुलींना चॉकलेट आणि कपड्यांचे आमिष दाखवत त्यांच्यावर अत्याचाराचा प्रयत्न केल्याचे समोर आले आहे. या नराधमाने आत्तापर्यंत ६०० मुलींवर अत्याचाराचा प्रयत्न केल्याची धक्कादायक माहितीही तपासातून उघड झाली आहे.

पूर्व दिल्लीतील एका शाळेत जाणा-या ७ वर्षीय चिमुरडीवर १२ डिसेंबररोजी अज्ञात व्यक्तीने लैंगिक अत्याचार केल्याची संतापजनक घटना घडली होती. याप्रकरणी न्यू अशोक नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. नराधमाने लहान मुलीला चॉकलेट आणि कपड्यांचे आमिष दाखवत निर्जनस्थळी नेले होते. तुझ्या बाबांचा मी मित्र असल्याचे त्या नराधमाने चिमुरडीला सांगितले होते. लहान मुलीने पोलिसांना दिलेल्या माहितीच्या आधारे नराधमाचे रेखाचित्रही तयार करण्यात आले. मात्र त्याचा शोध लागत नव्हता. शेवटी पोलिसांनी यापूर्वी बलात्काराप्रकरणी तुरुंगात गेलेल्या गुन्हेगारांचा रेकॉर्ड तपासायला सुरुवात केली. सुमारे ४० तुरुंगांमध्ये तपासणी केल्यावर शेवटी हल्दवानी तुरुंग प्रशासनाने नराधमाची ओळख पटवली. सुनील रस्तोगी असे या नराधमाचे नाव होते. पोलिसांनी सुनीलला उत्तराखंडमधील रुद्रपूरमधून अटक केली आहे.

ऑगस्ट २०१६ मध्येच सुनील रस्तोगी हा तुरुंगातून बाहेर आला होता. पूर्व दिल्लीतील सात वर्षाच्या मुलीवरील बलात्कारासोबतच अशाच स्वरुपाच्या अन्य दोन गुन्ह्यांमध्येही त्याचा सहभाग असल्याचे समोर आले आहे. सुनीलने आणखी दोन मुलींना चॉकलेटचे आमिष दाखवून निर्जनस्थळी नेण्याचा प्रयत्न केला. मात्र सुदैवाने त्या दोन्ही मुली रस्तोगीच्या तावडीतून सुटका करुन घेण्यात यशस्वी ठरल्या. रस्तोगीने आत्तापर्यंत ६०० मुलींवर अत्याचाराचा प्रयत्न केल्याची माहिती समोर येत आहे. शाळेबाहेर लहान मुलींना गाठून वडिलांचा मित्र असल्याची बतावणी करत तो लहान मुलींशी बोलायचा. रस्तोगी हा १९९० ते २००४ या कालावधीत दिल्लीत राहायचा. रस्तोगी हा विवाहित असून त्याला मुलगादेखील आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 16, 2017 8:04 am

Web Title: 38 year old tried to assault 600 girls in delhi arrested for raping minors
Next Stories
1 सर्व शाळांमध्ये इंग्रजी शिकवणे सक्तीचे करा!
2 निश्चलनीकरण हा मोदींचा धाडसी निर्णय
3 लघुग्रह आघातानंतर पृथ्वी थंड पडून डायनॉसॉर्सचा मृत्यू
Just Now!
X