वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) वसुलीत जानेवारी महिन्यात किरकोळ घट झाल्याचे दिसते. जानेवारीत एकूण ८६.३१८ कोटी रूपये जीएसटीची वसुली करण्यात आली. डिसेंबरच्या तुलनेत सुमारे ३८५ कोटींनी कमी आहे. डिसेंबरमध्ये ८६,७०३ कोटी रूपये जीएसटी वसूल करण्यात आला होता. अर्थ मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार २५ फेब्रुवारीपर्यंत मिळालेल्या आकडेवारीनुसार जानेवारीमध्ये एकूण ८६,३१८ जीएसटी वसूल करण्यात आला होता. यापूर्वी नोव्हेंबर आणि ऑक्टोबरमध्येही जीएसटी वसुलीत घट झाली होती.

मंत्रालयाने म्हटले की, दि. २५ फेब्रुवारीपर्यंत जीएसटी अंतर्गत १.०३ कोटी करदात्यांची नोंदणी झाली आहे. यामध्ये १७.६५ लाख कम्पोझिशन डीलर आहेत, ज्यांनी प्रत्येक तिमाहीमध्ये रिटर्न दाखल करण्याची आवश्यकता असते. यातील १.२३ लाख कंपोझिशन डिलर योजनेतून बाहेर गेले असून ते आता नियमित करदाता बनले आहेत. २५ फेब्रुवारीपर्यंत १६.४२ लाख कंपोझिशन डिलर होते. ज्यांनी प्रत्येक तिमाहीला रिटर्न दाखल करणे सक्तीचे आहे. उर्वरित ८७.०३ लाख करदात्यांना मासिक रिटर्न दाखल करण्याची आवश्यकता आहे.

अर्थ मंत्रालयाने म्हटले की, २५ फेब्रुवारी २०१८ पर्यंत जानेवारी महिन्यासाठी ५७.७८ लाख जीएसटीआर ३ बी रिटर्न दाखल करण्यात आले. हे एकूण करदात्यांच्या ६९ टक्के इतके प्रमाण आहे. त्यांना मासिक रिटर्न दाखल करण्याची आवश्यकता नाही. जानेवारीमध्ये एकूण जीएसटी कर वसुलीतील १४,२३३ कोटी रूपये सीजीएसटी, १९,९६१ कोटी रूपये हे एसजीएसटी, ४३,७९४ कोटी रूपये आयजीएसटी तसेच ८,३३१ कोटी रूपये उपकराच्या रूपात गोळा करण्यात आले.