देशात गेल्या २४ तासांत करोनाचे ३८६ रुग्ण आढळले. त्यामुळे एकूण रुग्णसंख्या १६३७ वर पोहोचली असून, आतापर्यंत १३२ रुग्ण बरे झाले आहेत.

एका दिवसातील नव्या रुग्णांचा हा सर्वात मोठा आकडा असला तरी तो मुख्यत्वे तबलिगी जमातच्या अनुयायांना झालेल्या बाधेमुळे वाढला आहे. हा देशव्यापी आलेख नसल्याची माहिती बुधवारी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली. आत्तापर्यंत ४७,९५१ वैद्यकीय चाचण्या झाल्या असून, सरकारी वैद्यकीय प्रयोगशाळांमध्ये ४५६२ चाचण्या करण्यात आल्या आहेत.

निजामुद्दीन मरकजमधील १८०० अनुयायींना दिल्लीतील नऊ रुग्णालयांत दाखल करण्यात आले आहे. विविध ठिकाणी त्यांचे विलगीकरण करण्यात आले आहे. केंद्र सरकार सातत्याने लोकांना आवाहन करत आहे की, कोणतेही धार्मिक किंवा सामाजिक समारंभ करू नये व लोकांनी गर्दी करू नये. करोना रोखण्याचा हा एकमेव पर्याय आहे. प्रवासी विमानांतून मालवाहतुकीची विशेष परवानगी हवाई वाहतूक मंत्रालयाने दिली आहे. वैद्यकीय उपकरणे, जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक करण्यासाठी १४ दिवस ही परवानगी देण्यात आली असल्याची माहिती आरोग्य सहसचिव लव अगरवाल यांनी दिली.

पंतप्रधान-मुख्यमंत्री आज संवाद

करोनासंदर्भातील आढावा घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी गुरुवारी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार आहेत. करोनाच्या आपत्तीला सामोरे जाण्यासाठी पंतप्रधान मोदी यांनी मंत्रिगट तसेच, ११ उच्चाधिकार गटांची स्थापना केली आहे. शिवाय, पंतप्रधान कार्यालय व केंद्रीय गृह मंत्रालय यांच्याद्वारे राज्य सरकार व त्यांच्या प्रशासनाशी केंद्राकडून संपर्क ठेवला जात आहे.