नेपाळला मुसळधार पावसाच्या बसलेल्या तडाख्यामुळे पूर येऊन दरडी कोसळल्याने किमान ३९ जण ठार झाले असून अनेक जण बेपत्ता झाले आहेत.

देशाच्या विविध भागांतील पूल पुराच्या पाण्यात वाहून गेले असून अनेक घरांची पडझड झाली आहे. पावसामुळे नद्या तुडुंब भरून वाहत असून त्यामुळे पुराचा धोका अधिकच वाढला आहे. या पुरात गेल्या २४ तासांत ३९ जण ठार झाले असून अन्य २८ जण बेपत्ता झाले आहेत. हजारो नागरिक विस्थापित झाले असून पुराचे पाणी घरांत शिरले आहे. नेपाळला गेल्या वर्षी भूकंपाचा जोरदार तडाखा बसला होता त्यामध्ये ज्यांची घरे उद्ध्वस्त झाली ते तात्पुरती डागडुजी केलेल्या घरांत वास्तव्य करीत होते, त्यांपैकी अनेक जण ठार झाले आहेत. पायथन या जिल्ह्य़ाला सर्वाधिक तडाखा बसला असून तेथे किमान ११ जण ठार झाले आहेत. गुलमी येथे दरडी कोसळून सात जणांचा बळी गेला आहे, तर पाच घरे आणि तीन पूल पुराच्या पाण्यात वाहून गेले आहेत.

 

हुरियत कॉन्फरन्सचे नेते गिलानी यांना अटक

श्रीनगर : कुलगम जिल्ह्य़ात जाण्याची बंदी घालण्यात आलेली असतानाही ती झुगारण्याचा प्रयत्न केल्याबद्दल पोलिसांनी हुरियत कॉन्फरन्सचे नेते सय्यद अलीशहा गिलानी यांना बुधवारी अटक केली. गिलानी यांना हुमहामा येथील त्यांच्या घराबाहेर नव्या विमानतळ मार्गावर अटक करण्यात आली. गिलानी यांना नजरकैदेत ठेवण्यात आले असून अटक करण्यात आल्यानंतर त्यांना पोलीस ठाण्यात नेण्यात आले, असे पोलिसांनी सांगितले. काश्मीर खोऱ्यात हिंसचाराचा उद्रेक झाला. त्यामध्ये कुलगाम जिल्ह्य़ात १० जण ठार झाले. गिलानी र्निबध असतानाही कुलगामला जाण्याच्या प्रयत्नांत होते, असे पोलिसांनी सांगितले.