जिनोआ : मुसळधार पावसाने जिनोआतील एक पूल कोसळल्याने किमान ३९ जणांचा मृत्यू झाला आहे.सरकारने या पुलाच्या देखभालीची जबाबदारी असलेल्या कंपनीला दुर्घटनेसाठी जबाबदार धरले आहे. अंतर्गत मंत्रालयातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार १६ जण जखमी झाले असून त्यातील १२ जणांची स्थिती गंभीर आहे.

जिनोआ ज्या भागात येते त्या लिग्युरिआ भागाला गेले काही दिवस मुसळधार पावसाने झोडपले आहे. मुसळधार पावसाने पुलाच्या देखभालीचे काम सुरू असलेल्या मोरांडी पुलाचा मोठा म्हणजे जवळजवळ ६०० फुटाचा भाग कोसळला. त्यामुळे ३५ गाडय़ा व अनेक ट्रक ४५ मीटर खाली असलेल्या रेल्वे मार्गावर कोसळले.  पुलाची जबाबदारी असलेल्या ऑटोस्ट्रेड पर इटालिया या खासगी कंपनीचे कंत्राट रद्द करून त्यांना १५० दशलक्ष युरोचा दंड ठोठावण्यात येणार आहे. रात्रीपासून आतापर्यंत तिघांचे मृतदेह शोधण्यात यश आले असून ढिगाऱ्याच्या मोठय़ा भागाखाली अडकलेल्यांचा शोध घेण्याचे आमचे प्रयत्न सुरू असल्याची माहिती अग्निशमन विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली.  रेल्वेमार्ग व ढिगाऱ्याच्या परिसरात मदतकार्यासाठी हजारो जण जमले असून जखमींना हेलीकॉप्टरमधून उपचारासाठी हलविण्यात येत आहे. ट्रक व गाडय़ा खाली कोसळत असताना आफिफी इद्रीस या मोरोक्कन लॉरीचालकाने आपली गाडी वेळीच थांबविल्याने तो या घटनेतून वाचला आहे. गाडीसह खाली कोसळूनही एक गोलरक्षकही वाचला आहे. २००१ नंतर युरोपमध्ये झालेली ही सर्वाधिक भीषण घटना मानली जाते.