गॅरेजमध्ये असलेल्या वेल्डिंग गॅस सिलिंडरवर वीजवाहक तार तुटून पडल्याने गॅस सिलिंडरचा स्फोट होऊन घडलेल्या दुर्घटनेत चार जण ठार, तर अन्य एक गंभीर जखमी झाला. शुक्रवारी वसमत तालुक्यातील हट्टा येथील जनता गॅरेजमध्ये ही भीषण दुर्घटना घडली.
हिंगोली-परभणी रस्त्यावर हट्टा येथे बसस्थानक परिसरात हे गॅरेज आहे. गॅरेजवरून वीज प्रवाह घेऊन जाणारी तार तुटून गॅरेजमध्ये असलेल्या वेल्डिंग गॅस सिलिंडरवर पडल्याने गॅसचा स्फोट झाला. यात रहीमखाँ गुलाबखाँ पठाण (वय ४०) यांचा गंभीर रीत्या भाजून जागीच मृत्यू झाला, तर अन्य चार जण भाजल्याने गंभीर जखमी झाले. जखमींना परभणी येथील रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले. मात्र, शेख अतीक शेख इसाक (वय ३०), गुलामखाँ जवाहरखाँ पठाण (वय ६७) व अजिजखाँ रहीमखाँ पठाण (वय ९) या तिघांचा रुग्णालयात मृत्यू झाला.