अज्ञात बंदूकधाऱ्यांकडून एडनमधील वृद्धाश्रमात १६ जणांची हत्या
येमेनमधील एडन शहरातील वृद्धाश्रमावर अज्ञात बंदूकधाऱ्यांनी शुक्रवारी केलेल्या हल्ल्यात ४ भारतीय जोगिणींसह १६ जणांचा मृत्यू झाला. हल्ल्याची जबाबदारी घेण्यास अद्याप कोणताही गट पुढे आलेला नाही.
मदर तेरेसा यांनी स्थापन केलेल्या कोलकाता येथील मिशनरीज ऑफ चॅरिटी या संस्थेतर्फे चालवल्या जाणाऱ्या या वृद्धाश्रमात ८० जण राहत होते.
हल्ला झाला तेव्हा दोन बंदूकधाऱ्यांनी आश्रमाला वेढा दिला तर अन्य चार बंदूकधाऱ्यांनी आश्रमात घुसून अंदाधुंद गोळीबार केला. हल्लेखोरांनी आश्रमातील प्रत्येक खोलीत जाऊन तेथील वृद्धांचे हात बांधले आणि त्यांच्या डोक्यात गोळ्या झाडल्या, अशी माहिती स्थानिकांनी दिली.
हल्ल्याचा सुगावा लागताच एक जोगिण सामानाच्या खोलीतील शीतकपाटात लपल्याने हल्ल्यातून जिवंत वाचली. हल्ल्यात एकूण १६ जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये ४ भारतीय, ६ इथिओपियाचे नागरिक, १ येमेनी खानसामा आणि अन्य येमेनी सुरक्षारक्षकांचा समावेश आहे. मृतदेह रुग्णालय आणि पोलिसांकडून ‘डॉक्टर्स विदाऊट बॉर्डर्स’ या संघटनेच्या स्वाधीन करण्यात आले आहेत. येमेनमधील हदिदा या बंदराच्या ठिकाणी १९९८ साली झालेल्या हल्ल्यातही जोगिणींना लक्ष्य बनवण्यात आले होते. येमेनमध्ये हौथी बंडखोरांनी केलेल्या सशस्त्र कारवायांमुळे सध्या अराजकाचे वातावरण आहे. देशाच्या अधिकृत सरकारचा देशाच्या अनेक भागांवरील ताबा संपत चालला आहे.

 

हल्ल्यात सीआरपीएफचे तीन जवान शहीद
रायपूर : छत्तीसगडमधील सुखमा जिल्ह्य़ात शुक्रवारी सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीदरम्यान सीआरपीएफचे ३ कमांडो शहीद झाले असून १२हून अधिक जण जखमी झाले आहेत.