चेन्नईमधल्या अरिग्नर अन्ना प्राणीसंग्रहालयातल्या चार सिंहांना करोनाची लागण झाली होती. त्यांच्या जनुकीय संरचनेच्या नमुन्यांच्या चाचणीनंतर हे समोर आलं आहे की त्यांनी करोना विषाणूच्या डेल्टा व्हेरिएंटचा संसर्ग झाला आहे. ही माहिती या प्राणी संग्रहालयाच्या प्रशासनाकडून देण्यात आली.

या प्राणी संग्रहालयाने ११ सिंहांचे नमुने करोना चाचणीसाठी पाठवले होते. त्यापैकी चार सिंहांचे नमुने २४ मे रोजी तर उरलेल्या सात सिंहांचे नमुने २९ मे रोजी पाठवले होते. त्यापैकी ९ सिंहांचा करोना अहवाल पॉझिटिव्ह आला. या सर्वांवर सध्या उपचार सुरु आहेत.


या प्राणी संग्रहालयाच्या व्यवस्थापकांकडून सांगण्यात आलं की, त्यांनी या सिंहांच्या जनुकीय संरचनेचा अहवाल मागवल्यानंतर वैद्यकीय संस्थांनी तो पाठवला. त्यामध्ये असं आढळून आलं की चार सिंहांना करोनाच्या डेल्टा व्हेरिएंटची लागण झाली आहे.
या पूर्वी नऊ वर्षांची सिंहीण नीला आणि पथबंथन नावाचा १२ वर्षांचा सिंह या दोघांचाही करोनामुळे मृत्यू झाला आहे.

तर गेल्या महिन्यात हैद्राबादमधल्या नेहरु प्राणीसंग्रहालयातल्या ८ सिंहांना करोनाची लागण झाली होती. या सिंहांना विलगीकरणात ठेवण्यात आलं होतं. द हिंदूने याविषयी दिलेल्या वृत्तानुसार, या सिंहांना कोरडा खोकला, नाक वाहणं, खाण्यापिण्याच्या तक्रारी अशी लक्षणं दिसून आल्यानंतर त्यांची चाचणी करण्यात आली.

२४ एप्रिलला सिंहांना ही लक्षणं जाणवत असल्याचं प्राणी संग्रहालयाच्या केअरटेकर्सच्या लक्षात आलं होतं. यापूर्वी अन्य देशात प्राण्यांना करोनाची लागण झाल्याचं समोर येत होतं. मात्र, भारतात प्राण्यांना करोनाची लागण होण्याची ही पहिलीच घटना ठरली. या प्राणी संग्रहालयातल्या १२हून अधिक कर्मचाऱ्यांनाही करोनाची लागण झाली होती.