रोहिंग्या निर्वासित दक्षिण बांगलादेशातील एका वनजमिनीवर झोपडी बांधत असताना जंगली हत्तींनी त्यांच्यावर केलेल्या हल्ल्यात ३ मुलांसह ४ निर्वासित ठार झाल्याचे पोलिसांनी सांगितले.

ही घटना कॉक्सस बाजार जिल्ह्य़ातील बालुखाली शिबिरात झाली. म्यान्मारमधील हिंसाचारामुळे पळून आलेल्या हजारो रोहिंग्यांनी या ठिकाणी तात्पुरते निवारे उभारले आहेत.

सात-आठ जंगली हत्तींनी या लोकांना चिरडून ठार केले. यात एक महिला व ३ मुलांचा समावेश आहे. आणखी दोघेजण यावेळी जखमी झाले, असे कॉक्सस बाजारचे पोलीस उपप्रमुख अफ्रोजुल हक तुतुल यांनी सांगितले.  हे लोक जंगलाच्या ज्या भागात झोपडी बांधत होते, त्या ठिकाणी जंगली हत्ती अन्न आणि निवाऱ्याच्या शोधात नेहमीच येतात, अशी माहिती त्यांनी दिली. या भागात जंगली हत्तींनी रोहिंग्या निर्वासितांवर हल्ला केल्याची घटना दुसऱ्यांदा घडली आहे. याआधी तात्पुरत्या निवाऱ्यात झोपलेला एक वयस्कर व्यक्ती व एक मुलगा अशा दोन रोहिंग्यांना हत्तींनी ठार केले होते.

म्यान्मारच्या सर्वात पश्चिमेकडील रखाइन प्रांतात २५ ऑगस्टला हिंसाचाराचा उद्रेक झाल्यानंतर अंदाजे ५ लाख ३६ हजार रोहिंग्या मुसलमान बांगलादेशात आले आहेत.

बांगलादेशाने त्यांच्यासाठी उभारलेल्या निर्वासित शिबिरांतील जागा आता संपूर्णपणे व्यापली गेली असून, नव्याने येणारे लोक कुठलीही झाडे व इतर झुडुपे तोडून पावसापासून स्वत:चे संरक्षण करण्यासाठी निवारे उभारत आहेत.