पोलिसांच्या कृतीचे स्वागत आणि आक्षेपही

हैदराबाद : देशाला सुन्न करणाऱ्या हैदराबाद सामूहिक बलात्कार प्रकरणाने शुक्रवारी धक्कादायक वळण घेतले. बलात्कार करून पशुवैद्यक तरुणीची हत्या करणाऱ्या चारही आरोपींना शुक्रवारी पहाटे कथित पोलीस चकमकीत ठार करण्यात आले.

या पोलीस चकमकीदरम्यान आरोपींनी केलेल्या हल्ल्यात एक पोलीस उपनिरीक्षक आणि एक पोलीस शिपाई जखमी झाल्याची माहिती सायबराबादचे पोलीस आयुक्त सी. व्ही. सज्जनार यांनी दिली.

पोलिसांनी आरोपींना चकमकीत ठार केल्याची माहिती सर्वत्र पसरताच देशभर संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या. अनेकांनी पोलिसांना शाबासकी दिली, तर काहींनी या चकमकीबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित करून कायदा हातात घेण्याच्या पोलिसांच्या कृतीवर आक्षेप घेतला. मानवी हक्क कार्यकर्ते आणि काही राजकीय नेत्यांनी आरोपींना ठार करणे ही ‘न्यायबाह्य़ हत्या’ असल्याची टीका केली आहे. ‘कायद्याने आपले कर्तव्य पार पाडले आहे, एवढेच मी म्हणू शकतो,’ अशी प्रतिक्रिया पोलीस आयुक्त सज्जनार यांनी टीकेला उत्तर देताना व्यक्त केली.

पशुवैद्यक तरुणीवर बलात्कार करून तिची हत्या केल्याच्या आणि मृतदेह जाळल्याप्रकरणी चारही संशयितांना २९ नोव्हेंबरला अटक करण्यात आली होती. या घटनेनंतर देशभर संतापाची लाट उसळली होती. या गुन्ह्य़ामुळे क्रौर्याची  परिसीमा गाठणाऱ्या २०१२च्या ‘निर्भया’ प्रकरणावरील खपली निघाली होती.

चारही संशयितांना न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली होती. गुन्ह्य़ाच्या चौकशीचा भाग म्हणून पोलीस शुक्रवारी पहाटे आरोपी मोहमद आरिफ (२६), जोलू शिवा (२०), जोलू नवीन (२०) आणि चिंताकुंता चेन्नाकेशवुलु (२०) यांना घटनास्थळी घेऊन गेले होते. तेथे पोलिसांची शस्त्रे हिसकावून गोळीबार करत आरोपी पलायन करीत असताना पोलिसांनी स्वसंरक्षणार्थ गोळीबार केला. त्यात सर्व चारही आरोपी ठार झाल्याचे सज्जनार यांनी सांगितले. ही पोलीस चकमक पहाटे ५.४५ ते ६.१५ दरम्यान घडली. पोलिसांनी आरोपींना हैदराबादपासून जवळच असलेल्या अज्ञात घटनास्थळावर नेले होते. आरोपींना बेडय़ा घातल्या नव्हत्या, असे सज्जनार यांनी सांगितले. ‘दोन आरोपींनी पोलिसांची शस्त्रे हिसकावून बेछूट गोळीबार केला. महंमद अरीफ या मुख्य आरोपीने प्रथम  गोळीबार केला. त्यानंतर आरोपींनी दहा पोलिसांच्या पथकावर दगड आणि काठय़ांनी हल्ला केला. पोलिसांनी त्यांना शरण येण्यास सांगितले. परंतु ते न आल्याने पोलिसांनी प्रत्युत्तरादाखल गोळीबार केला. त्यात चारही आरोपी ठार झाले, अशी माहिती पोलीस आयुक्त सज्जनार यांनी पत्रकारांना दिली.

आरोपींना घटनास्थळी पहाटेच का नेण्यात आले होते, असा प्रश्न विचारला असता, नागरिक संतप्त असल्याने आरोपींना धोका होता, असे उत्तर पोलीस आयुक्त सज्जनार यांनी दिले. चारही आरोपींचे मृतदेह घटनास्थळी पडले होते. त्यापैकी एका आरोपीच्या हातात पिस्तूल असल्याचे दिसत होते.

आरोपींना चकमकीत ठार मारल्याच्या वृत्तानंतर पीडित तरुणीचे वडील आणि बहीण यांनी समाधान व्यक्त करून पोलीस आणि सरकारला धन्यवाद दिले. तिचे वडील म्हणाले, ‘आरोपींना न्याय प्रक्रियेतून फाशीची शिक्षा ठोठावली जाईल असा आम्हाला विश्वास होता, पण ते चकमकीत मारले गेले. त्यामुळे आम्ही समाधानी आहोत.’

चकमकीच्या वृत्तानंतर नागरिकांनी तेलंगण पोलिसांचा जयजयकार केला. काही नागरिकांनी पोलिसांना मिठाईचे वाटप केले, तर काहींनी फटाके उडवले. या कथित चकमकीचे समर्थन करणाऱ्या आणि आक्षेप घेणाऱ्या प्रतिक्रियाही राजकीय नेत्यांनी व्यक्त केल्या. चकमकीचे तीव्र पडसाद संसदेच्या अधिवेशनातही उमटले.

घटनेची पाश्र्वभूमी

* २७ नोव्हेंबर रोजी ट्रकचालक आणि क्लीनर असलेल्या चारही आरोपींनी पशुवैद्यक तरुणीला स्कूटर उभी करताना पाहिले.

* ती परत येईपर्यंत आरोपींनी स्कूटरचे टायर पंक्चर केले. ती आल्यावर तिला मदत करण्याच्या बहाण्याने तिचे अपहरण करून आरोपींनी तिच्यावर सामूहिक बलात्कार केला.

* त्यानंतर तिची हत्या करून मृतदेह जाळला. पोलिसांनी दोन दिवसांत गुन्ह्य़ाचा छडा लावून संशयितांना अटक केली होती.