बिहारमधील गुन्हेगारी घटनांचा आलेख दिवसेंदिवस वाढत असल्याचे दिसत आहे. मुजफरपुरमध्ये चार जणांनी भरदिवसा एक खासगी बँकेवर दरोडा टाकून, आठ लाखांची रोकड लुटल्याची धक्कादायक घटना घडली आहे. विशेष म्हणजे ते चारही आरोपी अद्यापही बेपत्ता असुन, पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.

प्राप्त माहितीनुसार, मुजफ्फरपुर मधील उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँकेत ही घटना घडली. मंगळवारी दुपारी ३ वाजेच्या सुमारास चारजण दुचाकीवरून बँकेत आले होते. अवघ्या काही मीनिटांमध्ये त्यांनी कोणतीही भीती न बाळगता थेट कॅशिअरच्या केबिनचा ताबा घेतला व आठ लाखांची रोकड घेऊन ते पसार झाले. या सर्व आरोपींचे चेहरे सीसीटीव्हीत कैद झालेले आहेत.

सीसीटीव्हीतील दृश्यांच्या आधारे पोलीस या चारही आरोपींचा शोध घेत आहेत. विशेष म्हणजे ज्यावेळी हे चारही जण बँकेत आले तेव्हा एकही सुरक्षा रक्षक बँकेत उपस्थित दिसला नाही. २५ ते३० वयोगटातील ते चारहीजण होते. भरदिवसा घडलेल्या या घटनेमुळे बँकेत आलेल्या नागरिकांमध्ये प्रचंड भीती निर्माण झाली होती.