22 April 2019

News Flash

‘मी जेवत असताना बाबांनी गरम चमचाने चटके दिले’, चार वर्षाच्या चिमुरडीची सुटका

चार वर्षाच्या चिमुरडीला तिच्या आईने आणि प्रियकराने गरम चमचाने चटका देऊन मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे

चार वर्षाच्या चिमुरडीला तिच्या आईने आणि प्रियकराने गरम चमचाने चटका देऊन मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. हैदराबादमध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे. एका स्वयंसेवी संस्थेच्या कार्यकर्त्यांनी चिमुरडीची सुटका केली आहे. सुटका केलेल्या एनजीओच्या कार्यकर्त्यांना मुलीने आपल्यावर झालेल्या अत्याचाराची माहिती दिली.

‘मी जेवत असताना बाबांनी मला चटके दिले’, असं चिमुरडी एनजीओच्या कार्यकर्त्यांना सांगत होती. चिमुरडी जेव्हा आपल्यावर होत असलेल्या अत्याचाराबद्दल सांगत होती, तेव्हा तिला सामोरं जावं लागणारी परिस्थिती ऐकून कार्यकर्त्यांच्या डोळ्यात पाणी आलं. ‘बाबांनी मला आधी मारलं आणि नंतर गरम चमचाने मला चटका दिला’, असं चिमुरडी सांगत होती.

शेजाऱ्यांनी परिसरातील स्थानिक नेत्याला चिमुरडीवर अत्याचार होत असल्याची माहिती दिली होती. नंतर त्याने लहान मुलांसाठी काम करणाऱ्या कार्यकर्त्या अच्युथा राव यांना कळवलं. मुलीच्या आई आणि प्रियकराविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

तपासात महिला आपल्या पतीपासून विभक्त झाली होती, आणि आपल्या प्रियकरासोबत राहत असल्याची माहिती समोर आली आहे. जेव्हा दोघांमध्ये भांडणं होऊ लागली तेव्हा त्यांनी चिमुरडीवर राग काढण्यास सुरुवात केली. दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सुरु आहे.

First Published on September 11, 2018 2:08 pm

Web Title: 4 year old girl burnt by mother and her partner