मोदी सरकारला चार वर्ष पूर्ण होत असतानाच काँग्रेसने बुधवारी भाजपावर हल्लाबोल केला आहे. गेल्या चार वर्षांत फक्त भाषणं सुरु असून मोदी सरकारने जनतेचा विश्वासघात केला, अशी बोचरी टीका काँग्रेसने केली. सत्तेत आल्यावर तुम्ही जनतेचे विश्वस्त असता, तुम्हाला जनतेच्या पैशांची उधळपट्टी करण्याचा अधिकार नाही, असेही काँग्रेसने भाजपाला सुनावले आहे.

मोदी सरकारला चार वर्ष पूर्ण होत असून यानिमित्त भाजपाकडून देशभरात सरकारने केलेल्या कामांचा रिपोर्ट सादर केला जाणार आहे. तर दुसरीकडे काँग्रेसही आक्रमक झाली असून बुधवारी काँग्रेसने पत्रकार परिषदेत भाजपावर हल्लाबोल केला. गेल्या चार वर्षांत सरकारने जनतेचा विश्वासघात केला. आज लोकांच्या मनात भीती आणि अविश्वासाची भावना आहे, असे काँग्रेस नेते अशोक गहलोत यांनी सांगितले. पेट्रोल- डिझेलच्या दराने उच्चांक गाठला असून ही एक प्रकारची लुट आहे. पण केंद्र सरकारला सर्वसामान्यांची चिंताच नाही, असा आरोप त्यांनी केला.

केंद्र सरकारच्या वर्षपुर्तीनिमित्त सरकारी तिजोरीतून पैशांची उधळपट्टी करण्याचा पायंडा मोदी सरकारने घातला आहे. ज्या पद्धतीने दरवर्षी मोदी सरकारकडून जाहिरातींवर उधळपट्टी केली जाते, ते चुकीचे आहे. मुख्यमंत्री किंवा पंतप्रधान झाल्यावर आपण जनतेचे विश्वस्त असतो. तुम्हाला जनतेच्या पैशांची उधळपट्टी करण्याचा अधिकार नाही, असे अशोक गेहलोत यांनी म्हटले आहे.