पाकिस्तानवर नेहमीच दहशतवादाला खतपाणी घालण्याचा, दहशतवादी संघटनांना आश्रय देण्याचा आरोप होतो. अमेरिका दौऱ्यावर असलेले पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी मंगळवारी एका कार्यक्रमात अखेर हा आरोप मान्य केला आहे. पाकिस्तानातील सरकारांनी खासकरुन मागच्या १५ वर्षात सत्तेवर आलेल्या सत्ताधाऱ्यांनी अमेरिकेला सत्य कधीच सांगितले नाही.

पाकिस्तानात ४० विविध दहशतवादी संघटना सक्रिय होत्या हे इम्रान खान यांनी कबूल केले आहे. आम्ही दहशतवादाविरुद्ध अमेरिकेची लढाई लढत आहोत. ९/११ शी आमचे काही देणेघेणे नाही. अल कायदा अफगाणिस्तानात होती. पाकिस्तानात तालिबानचे दहशतवादी नव्हते. पण आम्ही अमेरिकेच्या लढाईत सहभागी झालो. दुर्देवाने जेव्हा काही गोष्टी चुकीच्या घडल्या तेव्हा मी माझ्या सरकारला दोष दिला. आम्ही जमिनीवरील खरी सत्य परिस्थिती अमेरिकेला सांगितली नाही असे इम्रान म्हणाले.

अमेरिकन काँग्रेसच्या शीला जॅक्सन ली कॅपिटोल हिल येथे आयोजित केलेल्या समारंभात इम्रान खान बोलत होते. पाकिस्तानात ४० विविध दहशतवादी संघटना सक्रिय होत्या. पाकिस्तानसाठी तो असा काळ होता जेव्हा आमच्यासारख्या लोकांना आम्ही यातून वाचू का? ही भिती आमच्या मनामध्ये होती. दहशतवादाविरुद्धची ही लढाई जिंकण्यासाठी आम्ही आणखी काहीतरी करावे अशी अमेरिकेची अपेक्षा होती. पण पाकिस्तानचा त्यावेळी स्वत:च्या अस्तित्वासाठी संघर्ष सुरु होता असे इम्रान यांनी सांगितले.