हजारो विस्थापित, अनेक जण बेपत्ता

इंडोनेशियामध्ये मुसळधार पावसाने आलेल्या पुरामध्ये आतापर्यंत ४० जण मृत्युमुखी पडल्याचे वृत्त आहे. त्याचप्रमाणे या पुरामध्ये अनेक जण बेपत्ताही झाले आहेत. पावसाळ्याच्या मोसमात भूस्खलन आणि पूर ही आता सर्वसामान्य गोष्ट झाली आहे.

इंडोनेशियाच्या आपत्कालीन यंत्रणेने सोमवारी २९ जण मरण पावल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला असून अद्यापही १३ जण बेपत्ता असल्याचे स्पष्ट केले आहे. लामपुंग प्रांतात शनिवारी मुसळधार पावसामुळे भूस्खलन होऊन त्यामध्ये एकाच कुटुंबातील सहा जण ठार झाले. दरम्यान, जाकार्ताच्या आजूबाजूच्या परिसरात आलेल्या पुरामुळे दोन जण ठार झाले तर जवळपास दोन हजारांहून अधिक जणांना घरातून बाहेर पडावे लागले आहे. सुमात्राच्या बेंग्कुलू प्रांतात पाणी साचल्याने १२ हजार नागरिकांना बाहेर काढावे लागले, त्याचप्रमाणे जवळपास १०० इमारती, पूल आणि रस्त्यांचे अतोनात नुकसान झाले. बेकायदेशीर कोळसा खाणींमुळे भूस्खलन मोठय़ा प्रमाणावर झाल्याचा आरोपही केला जात आहे. तर मानवनिर्मित संकटांमुळे पर्यावरणाचा ऱ्हास होऊन पूर आल्याचा आरोपही काही जणांनी केला आहे.