चीनमधील एका शाळेत विद्यार्थी आणि शिक्षकांवर हल्ला करण्यात आला आहे. चीनमधील गुआंग्शी प्रांतात ही घटना घडली आहे. चीन डेलीच्या हवाल्याने पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार, शाळेच्या सुरक्षा रक्षकाने शाळेतील विद्यार्थी आणि शिक्षक अशा एकूण ४० जणांवर चाकूने हल्ला करुन जखमी केलं आहे.

CGTN TV ने दिलेल्या वृत्तानुसार, ४० जण जखमी झालेले असून तीन जणांची प्रकृती गंभीर आहे. यामध्ये शाळेचे प्राध्यापक, एक सुरक्षा रक्षक आणि एका विद्यार्थिनीचा समावेश आहे. इतर जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. पोलिसांनी ५० वर्षीय हल्लेखोराला ताब्यात घेतलं असून रुग्णालयात पाठवलं आहे.

हल्ल्याची माहिती मिळताच विद्यार्थ्यांच्या पालकांनी रुग्णालयाबाहेर मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. हल्ला झालेले अनेक विद्यार्थी सहापेक्षा कमी वयाचे असल्याचं सांगण्यात येत आहे. चीनमधील काही भागांमध्ये गेल्या काही वर्षात चाकू हल्ला होण्याचा अनेक घटना समोर आल्या आहेत. हल्लेखोर खासकरुन सार्वजनिक वाहतूक यासोबत प्राथमिक शाळांना टार्गेट करत आहेत.