दिल्लीत इंधनाच्या दरवाढीच्या पार्श्वभूमीवर सोमवारी तब्बल ४०० पेट्रोल पंप आणि त्यासंबंधी सीएनजी पंप चालकांनी बंद पुकारला आहे. दिल्लीतील केजरीवाल सरकारने इंधनावरील व्हॅट कमी करण्यास नकार दिल्याने त्याविरोधात दिल्ली पेट्रोल डीलर्स असोसिएशने (डीपीडीए) विरोध दर्शवला आहे. दरम्यान, हा संप भाजपापुरस्कृत संप असल्याचा आरोप दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केला आहे.


डीपीडीएने सांगितले की, दिल्लीत सुमारे ४०० पेट्रोल पंप असे आहेत ज्यामध्ये सीएनजी स्टेशनही जोडलेले आहेत. हे सर्व पंप दिल्ली सरकारच्या व्हॅट कमी न करण्याच्या निर्णयाविरोधात सोमवारी २४ तासांसाठी बंद राहतील. हे सर्व पंप २२ ऑक्टोबर रोजी सकाळी ६ वाजल्यापासून २३ ऑक्टोबर रोजी सकाळी ५ वाजेपर्यंत बंद राहतील. दरम्यान, लोकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागू शकतो.

डीपीडीएचे अध्यक्ष निश्चल सिंघानिया यांनी सांगितले की, केंद्र सरकारने ४ सप्टेंबर रोजी पेट्रोल-डीझेलवरील उत्पादन शुल्कासह २.५० रुपये प्रति लिटर दरकपात केली होती. त्यानंतर शेजारील राज्ये हरयाणा, उत्तर प्रदेशसह विविध राज्यांनी आपल्या व्हॅटमध्ये (मुल्यवर्धीत कर) तेवढीच कपात करीत जनतेला ५ रुपयांचा दिलासा दिला होता. मात्र, दिल्ली सरकारने पेट्रोल-डीझेलवर व्हॅट कपात करण्यास नकार दिला. त्यामुळे दिल्लीत शेजारील राज्यांच्या तुलनेत इंधनाच्या किंमती वाढल्या आहेत. त्यामुळे दिल्लीतील लोक तिकडच्या पेट्रोल पंपांवर जात आहेत. त्यामुळे दिल्लीतील इंधन विक्रीमध्ये मोठी घट झाली आहे. दिल्लीत डीझेलच्या विक्रीत ५० ते ६० टक्के तर पेट्रोलच्या विक्रीत या तिमाहीत २५ टक्के घट झाल्याचा दावाही संघटनेकडून करण्यात आला आहे.


मात्र, पेट्रोल पंपांच्या संपावर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी टीका केली आहे. हा संप भाजपापुरस्कृत संप असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. पेट्रोल पंप चालकांनी आम्हाला खासगीत हा भाजपापुरस्कृत संप असल्याचे सांगितल्याचे केजरीवाल यांनी ट्विटरवर म्हटले आहे. त्यामुळे दिल्लीकरांना वेठीला धरणाऱ्या भाजपाला लोक आगामी निवडणूकीत उत्तर देतील असेही त्यांनी म्हटले आहे.