देशभरात उपाययोजना आणखी कठोर

पंतप्रधान मोदींकडून सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना सूचना

राज्यांना लवकरच टप्प्याटप्प्याने मदत

करोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी यंत्रणांचे विविध प्रयत्न सुरू असले, तरी गेल्या चोवीस तासांमध्ये देशभरात सरकारी आकडेवारीनुसार  ४००  नव्या रुग्णांची भर पडली. ( मात्र  बुधवारच्या बाधितांशी तुलना केली असता ही आकडेवारी ८००हून अधिक असल्याचे समोर आले. ) त्यामुळे सर्वच राज्यांनी उपाययोजना आणखी कठोर केल्या असून पंतप्रधान मोदी यांनी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी दूरचित्रसंवाद (व्हिडीओ कॉन्फरन्सिंग) साधत सूचना दिल्या.

२९ राज्यांमध्ये एकूण १९५५ करोनाबाधित रुग्ण आढळले. त्यापैकी ५३ रुग्णांचा मृत्यू झाला असून गेल्या चोवीस तासांमध्ये १२ रुग्ण दगावले आहेत. १५१ रुग्ण बरे होऊन त्यांना घरी पाठवण्यात आले असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य सहसचिव लव अगरवाल यांनी गुरुवारी दिली.  संसर्ग झालेल्या सुमारे ४०० प्रकरणांचा सांसर्गिक संबंध तबलिगी जमात समूहाशी आहे, असेही आरोग्य मंत्रालयाने स्पष्ट  केले.

कॅबिनेट सचिवांनी देशातील मुख्य सचिव आणि पोलीस महासंचालक यांच्याशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संपर्क साधला आणि त्यांना तबलिगी जमातमध्ये सहभागी झालेल्यांचे सखोल ‘काँटॅक्ट ट्रेसिंग’ सुरू करण्याचे, तसेच करोना विषाणूला आळा घालण्यासाठीच्या उपायांची युद्धपातळीवर अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले, असे अग्रवाल म्हणाले.

सुगीचे दिवस असून पिकांच्या कापणीसाठी टाळेबंदीतून सवलत द्यावी लागत आहे, पण त्याचा दुष्परिणाम भोगावा लागू नये याची खबरदारी घ्यावी लागेल. करोना टाळण्यासाठी गरजेच्या सर्व अटी पाळून काम करावे. कृषी बाजारांशिवाय दुसऱ्या कोणत्या मार्गाने शेतीमाल खरेदी करता येईल याचाही राज्य सरकारांनी विचार केला पाहिजे, असे मत मोदींनी मांडले. पंतप्रधान गरीब कल्याण योजनेअंतर्गत केंद्राने १ लाख ७५ हजार कोटींची मदत जाहीर केली आहे. एकाच वेळी बँकेत होणारी गर्दी टाळण्यासाठी ही मदत टप्प्याटप्प्याने दिली जाईल, अशी माहिती मोदींनी दिली.

चाचण्यांना प्राधान्य

राज्यांनी युद्धपातळीवर काम करावे व करोनाबाधित रुग्णांचा परिसर शोधून काढावा. या रुग्णांच्या प्राधान्याने वैद्यकीय चाचण्या कराव्यात. संशयितांचे विलगीकरण करावे. वैद्यकीय चाचण्या, बाधित व बाधितांची ठिकाणे शोधणे, विलगीकरण आणि विभक्तीकरण असा चारसूत्री कार्यक्रम राज्यांनी राबवावा, असे मोदींनी सांगितले.

जलद चाचणी फक्त पाच मिनिटांत

राज्यात सध्या करोनाच्या पाच हजार चाचणींची क्षमता आहे. त्यासह केंद्र सरकारने आता जलद चाचणीची (रॅपिड टेस्ट) मान्यता दिली असून त्यामुळे करोनाची प्राथमिक चाचणी केवळ पाच मिनिटांत करून करोना आहे की नाही हे स्पष्ट होईल.

’त्यामुळे महाराष्ट्रात आता मोठय़ा प्रमाणात या जलद चाचणी करण्यात येतील, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.  करोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना चाचण्यांची संख्या तुलनेत मर्यादित होती.

’राज्यात पाच हजार चाचण्यांची क्षमता होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेल्या बैठकीत करोनाच्या जलद चाचणीला (रॅपिड टेस्ट) मान्यता देण्यात आली आहे.

राज्यात स्वतंत्र रुग्णालये

दिल्लीतील मरकजमध्ये सहभागी झालेल्या राज्यातील  नागरिकांपर्यंत प्रशासन पोहचले असून त्यांना विलगीकरणात ठेवण्यात येत आहे. त्याचप्रमाणे राज्यात संचारबंदीची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत असून करोना बाधितांवर उपचारासाठी मुंबईत तसेच राज्याच्या अन्य भागात स्वतंत्र रुग्णालये राखीव ठेवण्यात येत असल्याची माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गुरूवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिली.  १५

एप्रिलनंतरही अधिक दक्षता हवी

– नरेंद्र मोदी

टाळेबंदीचा कालावधी संपल्यानंतर लोक झुंडीने घराबाहेर पडतील. त्यामुळे पुन्हा करोनाचा प्रादुर्भाव होण्याची भीती असून हा धोका टाळला पाहिजे. त्यासाठी सर्व राज्यांमध्ये एकसमान धोरण राबवले पाहिजे. या संभाव्य धोरणाचा आराखडा तयार करण्यासाठी सूचना पाठवा, अशी विनंती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्र्यांच्या दूरसंचार यंत्रणेद्वारे गुरुवारी झालेल्या बैठकीत केली.जगभरात करोनाचे रुग्ण वाढत आहेत. जिथे ही महासाथ नियंत्रणात आणण्यात यश आले तिथेही साथीच्या दुसऱ्या लाटेची शक्यता व्यक्त केली जात आहे. जागतिक स्तरावर होत असलेले प्रयत्न पुरेसे नसल्याचे दिसते. त्यामुळे भारतात अधिक दक्षता बाळगण्याची गरज आहे. अन्यथा टाळेबंदी संपल्यावर लोकांचे व्यवहार पूर्ववत सुरू होतील असे सांगत मोदींनी टाळेबंदीनंतरही टाळेबंदीतील कडक दक्षतेचे पालन करण्याची अप्रत्यक्ष सूचना केली. राज्य सरकारांनी टाळेबंदीच्या अंमलबजावणीत कसूर न करण्याचाही सल्ला दिला.