पाकिस्तानातील पंजाब प्रांतात असलेल्या ऐतिहासिक गुरूनानक महालाची तोडफोड केल्याचा प्रकार समोर आला आहे. काही उपद्रवी स्थानिकांनी या महालाची तोडफोड केल्याची माहिती समोर आली आहे. स्थानिकांनी या महालाची तोडफोड करून महालातील महागड्या खिडक्या आणि दरवाजे विकल्याचाही माहिती मिळाली आहे. या चार मजली इमारतीत शीख धर्माचे संस्थापक गुरू नानक देव यांच्याव्यतिरिक्त हिंदू शासक आणि राजकुमारांची ऐतिहासिक चित्रेही लावण्यात आली होती.

ऐतिहासिक गुरू नानक महालाची उभारणी तब्बल चारशे वर्षांपूर्वी करण्यात आली होती. भारताबरोबरच जगभरातील शीख समुदायातील भाविक या ठिकाणी येत असतात. लाहोरपासून 100 किलोमीटरवर असलेल्या नारोवाल या ठिकाणी हा महाल उभारण्यात आला आहे. यामध्ये 16 खोल्या असून प्रत्येक खोल्यांमध्ये 3 नाजूक दरवाजे आणि वारा खेळता राहण्यासाठी खिडक्या लावण्यात आल्या होत्या. दरम्यान, औकाफ विभागाच्या अधिकाऱ्यांच्या कथितरित्या मौन संमतीने स्थानिकांनी महालाची तोडफोड केली आणि त्यातील महागड्या खिडक्या आणि दरवाजे विकल्याची माहिती समोर आली आहे. पाकिस्तानातील डॉन या वृत्तपत्राने यासंदर्भात वृत्त दिले आहे.

या ऐतिहासिक वास्तूला ‘बाबा गुरू नानक महाल’ असे म्हटले जाते. परंतु आम्ही त्याला ‘महलां’ असे नाव दिल्याची माहिती स्थानिक निवासी मोहम्मद अस्लम यांनी दिली. भारताव्यतिरिक्त जगभरातून शीख समुदायातील भाविक या ठिकाणी येत होते. या ठिकाणी काही उपद्रवी लोक तोडफोड करत असल्याची माहिती आम्ही औकाफ विभागाला दिली होती. परंतु कोणताही अधिकारी या ठिकाणी आला नाही आणि कोणतीही कारवाई केली नाही, असेही त्यांनी सांगितले.

काही उपद्रवी लोकांनी औकाफ विभागाच्या मौन संमतीने या महालाच्या वास्तूची तोडफोड केली आणि त्यातील ऐतिहासिक महागड्या खिडक्या, दरवाजे आणि लाकडांची विक्री केल्याची माहिती स्थानिक मोहम्मद अश्रफ यांनी दिली. दरम्यान डॉनने दिलेल्या माहितीनुसार, त्यांनीदेखील इवेक्यूई ट्रस्ट प्रॉपर्टी बोर्डच्या उपायुक्तापासून या ठिकाणी राहणाऱ्या परिवारापर्यंत अनेकांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला होता. परंतु या ऐतिहासिक वास्तूची कायेदशीर स्थिती, मालकी हक्क आणि कोणत्या सरकारी संस्था या ऐतिहासिक वास्तूचा रेकॉर्ड ठेवतात, याबाबत कोणतीही माहिती मिळाली नाही.

दरम्यान, या इमारतीचा कोणताही रेकॉर्ड उपलब्ध नसल्याची माहिती नरोवालचे उपायुक्त वहीद असगर यांनी सांगितले. तसेच ही वास्तू ऐतिहासिक होती आणि नगरपालिका समितीच्या रेकॉर्डचा तपास सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. इवेक्यूई ट्रस्ट प्रॉपर्टी बोर्ड सियालकोट रेंट कलेक्टर रवी राणा यांनी गुरू नानक महालाच्या तोडफोडीसंबंधी आपली टीम तपास करत असल्याची माहिती दिली. तसेच यामध्ये सहभागी असलेल्यांविरोधात कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचेही सांगितले. तसेच स्थानिकांनी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्याकडेही या उपद्रवी लोकांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.