सध्या देशात करोनाच्या उपचाराधीन रुग्णांची संख्या सात लाख ७२ हजार असली तरी, पुढील चार महिन्यांत म्हणजे फेब्रुवारीपर्यंत केवळ ४० हजार उपचाराधीन रुग्ण असतील, असा अंदाज केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी सोमवारी वर्तविला.

देशात करोनाचे शिखर पार केल्याचे आणि आगामी चार महिन्यांत करोना आटोक्यात येऊ शकेल, असे निरीक्षण केंद्रीय विज्ञान व तंत्रज्ञान मंत्रालयाने नेमलेल्या दहा सदस्यांच्या समितीने गणिती प्रारूपाच्या आधारे नोंदवले आहे. या समितीने आकडय़ांच्या स्वरूपात त्याची माहिती दिलेली नव्हती. मात्र, आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी याच समितीच्या अहवालाचा आधार घेत करोना रुग्णांच्या संख्येचा अंदाज मांडला. दैनंदिन सुमारे ९० हजार रुग्णवाढ आता ५५ हजारांवर आली असून रुग्णवाढीचा वेग कमी होऊ लागला आहे. पुढील काही महिन्यांमध्ये हा वेग पुन्हा वाढणार नाही याची सरकार दक्षता घेईल, असेही हर्षवर्धन यांनी पत्रकारांना सांगितले.

आतापर्यंत देशातील ३० टक्के लोकांना करोनाची बाधा होऊन गेली असून फेब्रुवारीपर्यंत ती संख्या ५० टक्क्यांपर्यंत पोहोचेल, असे गणिती अनुमान तज्ज्ञ समितीने काढले आहे. आयआयटी, हैदराबादचे प्राध्यापक एम. विद्यासागर यांच्या समितीचे सदस्य मिहद्र अगरवाल यांनी वृत्तसंस्थेला दिलेल्या माहितीनुसार, सीरो सर्वेक्षणातील अंदाजापेक्षा गणिती प्रारूपातील आकडे तुलनेत अधिक आहेत. भारतीय वैद्यकीय संशोधन संस्थेने केलेल्या सीरो सर्वेक्षणानुसार १४ टक्के लोकांना करोनाची बाधा होऊन गेली आहे. पण देशातील निम्म्या लोकांना साथरोगाची लागण होऊन गेली असेल तर करोनाच्या प्रादुर्भावाचा वेग कमी होऊ शकेल, असे अगरवाल यांचे म्हणणे आहे.

दिल्लीच्या आरोग्यमंत्र्यांची टीका

काही जिल्ह्यांमध्ये समूह संसर्ग होण्याची शक्यता असली तरी देशभर तसे होताना दिसत नाही, असे केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी रविवारी सांगितले होते. त्यावर दिल्लीचे आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन यांनी टीका केली आहे. केंद्राने आता तरी देशात समूह संसर्ग होऊ लागल्याचे स्पष्ट सांगितले पहिजे. देशात लाखो रुग्ण आढळले असतानाही केंद्र समूह संसर्गाचे वास्तव मान्य करत नाही, असे जैन म्हणाले.