नेपाळमधील मुसळधार पावसामुळे आणि बिहारमध्ये सुरू असलेल्या संततधार पावसामुळे, पुराच्या संकटामुळे आत्तापर्यंत ४१ लोकांचा मृत्यू झाला आहे. तर पाऊस आणि पुराच्या रौद्र रूपामुळे बिहारमधील १२ जिल्ह्यातील सुमारे ६५ लाख लोक पूरग्रस्त झाले आहेत.

किशनगंज, अररिया, पूर्णिया, कटिहार, दरभंगा यांसह एकूण १२ जिल्ह्यात पाऊस आणि पुरानं कहर माजवला आहे. अररिया जिल्ह्यात पुरामुळे २१ लोकांचा मृत्यू झाला आहे अशी माहिती आपत्ती व्यवस्थापन विभागाचे मुख्य सचिव प्रत्यय अमृत यांनी दिली आहे. आत्तापर्यंत १ लाख ८२ हजार ४८० पूरग्रस्तांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आलं असून इतर लाखो पूरग्रस्तांना मदत करण्याचं आणि सुरक्षित स्थळी हलविण्याचं काम युद्धपातळीवर सुरू असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.

पूरग्रस्त भागांमध्ये एनडीआरएफ २२ पथकांमधील ९४९ जवान हे सध्या लोकांना संकटातून वाचविण्याचा त्यांच्या परिनं पूर्ण प्रयत्न करत आहेत, १०० नौका, एसडीआरएफच्या टीमचे ४२ जवान आणि ८२ नौका आणि सैन्य दलाचे ६३० जवान आणि त्यांच्या ७० नौका हेदेखील लोकांना पूरग्रस्त भागातून सुरक्षित स्थळी नेण्याचे आटोकाट प्रयत्न करत आहेत.

किशनगंज आणि हटवार या दोन रेल्वे स्थानकांदरम्यान पाण्यानं धोक्याची पातळी ओलांडली आहे त्यामुळे अनेक एक्स्प्रेस ट्रेन रद्द करण्यात आल्या आहेत अशी माहिती बिहार पूर्व मध्य रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी राजेश कुमार यांनी दिली आहे. आत्तापर्यंत ३३ गाड्या रद्द् करण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली आहे.

बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी आजच बिहारचा हवाई दौरा करून पूरस्थितीची पाहणी केली, तसंच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अर्थमंत्री अरूण जेटली यांच्यासोबतही या संदर्भात चर्चा केली. बिहारला पुराच्या संकटातून बाहेर पडण्यासाठी केंद्रानं मदत करावी असं आवाहन नितीशकुमार यांनी केलं आहे. तसंच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही नितीशकुमार यांना बिहारसाठी शक्य तेवढी मदत करू असं आश्वासन दिलं आहे.

मागील तीन दिवसांपासून सातत्यानं पडत असलेल्या पावसामुळे बिहारमधील १२ जिल्हे पूर संकटात सापडले आहेत. या नैसर्गिक संकटातून लोकांना सोडविण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करणार आहोत असंही मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी जाहीर केलं आहे.