लष्कर भरती प्रक्रियेदरम्यान पाच अल्पवयीन उमेदवारांसह एकूण ४२ उमेदवारांकडे बनावट कागदपत्रे असल्याचे आढळून आले, अशी माहिती रविवारी पोलिसांनी दिली.
शनिवारी येथे लष्कर भरती प्रक्रिया करण्यात आली. त्यात उमेदवारांकडून बनावट कागदपत्रे सापडली, अशी माहिती कोटा लष्कर भरती कार्यालयाचे संचालक कर्नल कमल उपरती यांनी दिली.
कर्नल उपरती यांच्या मते सर्वच्या सर्व ४२ उमेदवार हे उत्तर प्रदेशमधील आग्रा व फिरोझाबाद येथील रहिवासी आहेत. बनावट कागदपत्रांमध्ये इयत्ता दहावी तसेच इयत्ता बारावीच्या गुणपत्रिका, अधिवास प्रमाणपत्रे आणि चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्रांचा समावेश आहे.
प्राथमिक चौकशीमध्ये आपण एका दलालामार्फत ही कागदपत्रे मिळविल्याचे त्यांनी मान्य केले आहे, असेही कर्नल उपरती यांनी म्हटले आहे.
लष्कराकडून यासंदर्भात कलम ४२० आणि कलम ४६७ तसेच भारतीय दंड संहितेच्या अन्य कलमांच्या आधारे तक्रार दाखल करण्यात आली आहे. अल्पवयीन पाच उमेदवारांना बाल न्यायालयासमोर उभे केले जाणार असून अन्य उमेदवारांना न्यायदंडाधिकारी यांच्यासमोर उभे केले जाणार आहे, असे तरुण कांत सोमाणी यांनी सांगितले.
ही बनावट कागदपत्रे एका दलालाला दोन ते अडीच हजार रुपये देऊन खरेदी केल्याचे काही उमेदवारांना प्राथमिक चौकशीत सांगितले अशी माहिती पोलीस उपअधीक्षक राजन दुष्यंत यांनी दिली.
प्रमाणपत्रांची पडताळणी सोमवारी केली जाणार असून ही कागदपत्रे स्थानिक कार्यालयाकडून देण्यात आली आहेत असे आढळून आले तर तेथील अधिकाऱ्यांची चौकशी केली जाणार आहे, अशी माहितीही राजन दुष्यंत यांनी दिली.