लष्करातील दोन अधिकाऱ्यांचा समावेश

बांगला देशामध्ये मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी भूस्खलन होऊन त्यामध्ये लष्करातील दोन अधिकाऱ्यांसह ५३ जण ठार झाल्याचे वृत्त आहे. भूस्खलनामुळे अनेक ठिकाणी चिखल साचला असून त्याखाली अनेक जण गाडले गेल्याची भीती व्यक्त केली जात असल्याने मृतांची संख्याही वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

बांगला देशच्या रंगमती जिल्ह्य़ात सर्वाधिक म्हणजे ३६ जण ठार झाले असून लष्कराचे दोन अधिकारीही येथेच ठार झाले आहेत. तर अन्य कर्मचारी जखमी झाले आहेत इतकीच माहिती सध्या देऊ शकत असल्याचे लष्कराच्या प्रवक्त्याने सांगितले.

रात्रभर झालेल्या पावसामुळे भूस्खलन होऊन रस्त्यावर चिखल साचल्याने रंगमती जिल्ह्य़ास जोडणारा रस्ता मोकळा करण्यासाठी लष्कराला पाचारण करण्यात आले होते. रस्ता मोकळा करण्याचे काम सुरू असतानाच भूस्खलन होऊन त्या खाली ते गाडले गेले, असे प्रवक्त्याने सांगितले. रंगमती, बंदरबन आणि चितगाँव येथे आतापर्यंत ५३ जण ठार झाल्याचे वृत्त ‘ढाका ट्रिब्यून’ने दिले आहे.

चितगाँवच्या रंगुनिया आणि चंदानाइश उपजिल्ह्य़ांमध्ये ११ जण, बंदरबनमध्ये सहा जण ठार झाल्याचे पोलिसांनी सांगितले. हजारो टन चिखलाखाली अनेक जण गाडले गेल्याची भीती व्यक्त करण्यात येत असल्याने लष्कराच्या जवानांना पाचारण करण्यात आले आहे.