पृथ्वीचा सर्वात जवळचा शेजारी ग्रह असलेल्या मंगळावर मानवी वसाहत करण्यासाठी पाठवण्यात येणाऱ्या व्यक्तींच्या निवड यादीत ४४ भारतीयांचा समावेश करण्यात आला आहे. नेदरलँडमधील एका स्वयंसेवी संस्थेने आयोजित केलेल्या या २०२४ सालच्या मोहिमेसाठी दोन पुरुष व दोन महिलांची निवड करण्यात येणार असून, जगभरातून तब्बल ७०५ जणांनी यासाठी आपली इच्छा दर्शवली आहे.
नेदरलँडमधील ‘मार्स वन’ या संस्थेने २०२४साली मंगळावर ‘एकतर्फी यात्रा’ नियोजित केली आहे. या यात्रेसाठी दोन पुरुष व दोन महिलांची निवड करण्यात येणार असून, त्यासाठी जगभरातून दोन लाखांहून अधिक जणांनी अर्ज केला होता. त्यातून १०५८ जणांना पात्र ठरवण्यात आले. यामध्ये ६२ भारतीयांचा समावेश होता. मात्र, या यादीतून ३५३ जणांची नावे वगळण्यात आली असून उरलेल्या ७०५ जणांमध्ये ४४ भारतीय आहेत. भारतीयांत २७ पुरुष व १७ महिलांचा समावेश असून ते मुंबई, पुणे, दिल्ली, हैदराबाद आणि थिरूवनंतपुरम येथे राहणारे आहेत.
या मोहिमेअंतर्गत निवडण्यात येणाऱ्या चौघांना मंगळावर मानवी वसाहत करण्यासाठी पाठवण्यात येणार आहे. ‘या साहसी मोहिमेच्या निवडप्रक्रियेची दुसरी फेरी आता सुरू झाली आहे. या मोहिमेत निवड होण्यासाठी इच्छुकांना बुद्धिमत्ता, ज्ञान, अनुकूलनीयता आणि व्यक्तिमत्त्वाच्या कसोटीवर उतरावे लागेल,’ असे मार्स वनचे मुख्य वैद्यकीय अधिकारी नोर्बर्ट क्राफ्ट यांनी सांगितले.

वारीची तयारी
* डिसेंबर २०१३मध्ये ‘मार्स वन’कडून मोहिमेची घोषणा. इच्छुकांना मार्च २०१४पर्यंत वैद्यकीय सक्षमतेचे प्रमाणपत्र आणि व्यक्तिगत माहिती पाठवण्याचे आवाहन.
* ३५३ जणांची या फेरीतून माघार. वैयक्तिक कारणास्तव माघार घेणाऱ्यांत बहुसंख्य ४०-५० वयोगटातील, तर वैद्यकीय कारणास्तव माघार घेणाऱ्यांची सर्वाधिक संख्या २०-३५ वयोगटातील.
* उरलेल्या ४१८ पुरुष आणि २८७ महिलांची मुलाखत होणार. यात पात्र ठरणाऱ्यांचे दोन महिला व दोन पुरुष असे गट तयार करणार.
* या गटांना मंगळावर वास्तव्याच्या दृष्टीने प्रशिक्षित केले जाणार. प्रशिक्षणादरम्यान अपयशी ठरलेल्यांना हटवून नव्या
* गटांची निवड करण्याचेही अधिकार मार्स वनला.
* अंतिम फेरीत सहा गटांची निवड करून त्यांना २०१५ ते २०२४ या कालावधीत पूर्ण प्रशिक्षण देणार. यातून एका गटाची मंगळ वारीसाठी निवड करणार.